Tue, May 30, 2017 04:04
29°C
  Breaking News  


होमपेज › National › शिक्षण, आरोग्यसेवा करमुक्‍त

शिक्षण, आरोग्यसेवा करमुक्‍त

By pudhari | Publish Date: May 20 2017 8:12AM


श्रीनगर/नवी दिल्ली : वृत्तसंस्था

वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) परिषदेच्या बैठकीच्या दुसर्‍या दिवशी शुक्रवारी सेवांवर आकारण्यात येणारा कर निश्‍चित करण्यात आला. शिक्षण आणि आरोग्यसेवेला करमुक्‍त करण्यात आले आहे. फायनान्स सर्व्हिसेससाठी 18 टक्के कर दर निश्‍चित करण्यात आल्याने इन्श्युरन्स आणि इतर फायनान्स सर्व्हिसेस महागणार आहेत. तर वाहतूक सेवा स्वस्त होणार आहे. सोन्यासह आणखी सहा वस्तूंवरील कराचा दर ठरवण्यासाठी परिषदेने तीन जूनला आणखी एक बैठक बोलावली आहे.

‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीच्या दुसर्‍या दिवशी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीतील विविध निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत दिली. गुरुवारी विविध वस्तूंवरील कर निश्‍चित करण्यात आले होते. शुक्रवारी सेवांचे दर निश्‍चित करण्यात आले. ‘जीएसटी’ एक जुलैपासून लागू होणार आहे.

देशातील विविध सेवांवर आकारण्यात येणार्‍या कराचेही 5, 12, 18 आणि 28 टक्के असे चार टप्पे करण्यात आले आहेत. सध्या 15 टक्के या एकाच दराने सर्व सेवांवर कर आकारण्यात येत आहे. दिल्या जाणार्‍या सेवेचे स्वरूप पाहून त्यामध्ये विविध उपगट करण्यात आले असून त्याप्रमाणे कर आकारण्यात येणार आहेत.

शिक्षण, आरोग्यसेवा करमुक्‍त
देशातील शिक्षण आणि आरोग्यसेवेवर सध्याप्रमाणेच कोणताही कर आकारण्यात येणार नाही. या सेवांना ‘जीएसटी’ करप्रणालीतून वगळण्यात आले आहे. याशिवाय मेट्रो आणि लोकलमधील प्रवास, धार्मिक यात्रा आणि हज यात्राही करमुक्‍त करण्यात आल्या आहेत. दूरसंचार सेवेवरील करात वाढ करण्यात आली आहे. या सेवेसाठी 18 टक्के कर निश्‍चित करण्यात आला आहे. सध्या हा कर 15 टक्के आहे. 18 टक्के कर स्लॅबमध्ये ब्रँडेड गारमेंट्स आणण्यात आली आहेत.

फायनान्स सर्व्हिसेसवर तीन टक्के कर वाढवण्यात आला आहे. सध्या बँकिंग, इन्श्युरन्ससह फायनान्स सर्व्हिसेसवर 15 टक्के कर आकारण्यात येतो. मात्र, ‘जीएसटी’ दर 18 टक्के निश्‍चित करण्यात आल्याने ही सेवा महागणार आहे.
 

हॉटेल्स आणि कॅसिनोज
हॉटेल सेवांवर 12 ते 18 टक्के, तर  कॅसिनो, चित्रपटगृहांवर 28 टक्के कर आकारण्यात येणार आहे. मालवाहतूक आणि हवाई वाहतुकीसह सर्व वाहतूक सेवांवर सध्याच्या 15 टक्क्यांऐवजी पाच टक्के कर आकारण्यात येणार असल्याने वाहतूक सेवा स्वस्त होणार आहे. एसी रेल्वे वाहतूक आणि विमान वाहतूक स्वस्त होणार आहे. ओला आणि उबेर या वाहतूकदारांना पाच टक्के कर आकारण्यात येणार आहे. 50 लाख रुपयांच्या आत उलाढाल असलेल्या रेस्टॉरंटस्ना पाच टक्के कर आकारण्यात येईल. नॉन एसी फूड जॉईंटस्ना 12 टक्के, तर मद्य विकण्याचा परवाना असलेल्या एसी हॉटेल्सवर 18 टक्के कर आकारण्यात येणार आहे. दिवसाला 1000 रुपयांपेक्षा कमी पैसे आकारणार्‍या हॉटेल्सना करातून वगळण्यात आले आहे. तर 1000 ते 2500 रुपये भाडे आकारणार्‍या हॉटेल्सना 12 टक्के कर द्यावा लागेल. पंचतारांकित आणि लक्झरी हॉटेल सेवेसाठी 28 टक्के कर द्यावा लागणार आहे. जुगार, रेस क्‍लब बेटिंग आणि चित्रपटगृहांच्या सेवेवर 28 टक्के कर आकारण्यात येणार आहे. चित्रपटगृहांच्या सेवेवर सध्या 15 टक्के कर अधिक राज्यांचा मनोरंजन कर लावला जातो. आता एकच 28 टक्के कर आकारला जाणार असल्याने ही सेवा स्वस्त होणार आहे.

कंत्राटदारांना दिलासा
पायाभूत सुविधांची उभारणी करणार्‍या कंत्राटदारांना सध्या सहा टक्के केंद्रीय कर अधिक राज्यांचा कर द्यावा लागतो. त्याशिवाय सिमेंटसारख्या अनेक बांधकाम वस्तूंवर त्यांना वेगळा कर द्यावा लागतो. आता मात्र त्यांना एकच 12 टक्के कर द्यावा लागणार आहे.
 

पुढील बैठक 3 जूनला
जीएसटी परिषदेची पुढील बैठक 3 जूनला होणार असून त्यात बायोडिझेल, पादत्राणे, सोने, कपडे, शेती उपकरणे, बिडी, सिगारेट या वस्तूंवरील कराचे दर ठरवण्यात येणार आहेत.