Mon, Nov 20, 2017 17:22होमपेज › National › स्वप्नातली  बुलेट ट्रेन!

स्वप्नातली  बुलेट ट्रेन!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

देशाचे स्वप्न असणार्‍या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन 14 सप्टेंबरला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे यांच्या हस्ते अहमदाबादमध्ये होत आहे. नरेंद्र मोदी सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेली बुलेट ट्रेन 15 ऑगस्ट 2022 रोजी सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. याच दिवशी देश स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करणार आहे. 

  खर्च : या प्रकल्पावर एकूण 1 लाख 10 हजार कोटींचा खर्च होणार आहे. त्यापैकी 88 हजार कोटी रुपयांचे कर्ज जपान सरकार 0.1 टक्के इतक्या अत्यल्प व्याजदराने पुरवणार आहे. हे कर्ज 50 वर्षांत फेडायचे आहे. त्याचबरोबर कर्ज मिळाल्यानंतर 15 वर्षांनी त्याची फेडण्याची प्रक्रिया सुरू होईल. या कर्जाचे व्याज दर महिन्याला सात ते आठ कोटींमध्ये असेल. 
  मेक इन इंडिया आणि तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान ः जपानी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय अभियंते हा प्रकल्प उभा करतील. हे अत्युच्च दर्जाचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. मेक इन इंडिया योजनेखालील हा प्रकल्प भारतीय रेल्वेची भविष्यातील दिशा ठरवणार आहे. 

रोजगार  ः केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार प्रकल्प पूर्ण होण्याच्या कालावधीपर्यंत 20 हजार लोकांना रोजगार प्राप्त होईल. या लोकांना देशातील पुढील बुलेट ट्रेनच्या प्रकल्पांसाठी प्रशिक्षित केले जाणार आहे. त्यासाठी वडोदरा येथे अति वेगवान रेल्वे प्रशिक्षण संस्था स्थापन केली जाणार आहे. 

सुरक्षितता : या बुलेट ट्रेन अगदी नियोजित वेळेनुसार धावतील. या रेल्वेमध्ये धोक्याची सूचना देणारी यंत्रणा असेल. त्याचबरोबर हा धोका कसा टाळावा याचेही मार्गदर्शन या प्रणालीमध्ये असेल. भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्येही या रेल्वेचा प्रवास सुरक्षित राहील. सुमारे 825 हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेली आहे.

1,10,000 

कोटींचा प्रकल्प

350

किलोमीटर ताशी वेगाने धावत दोन तासांत कापणार 508 किमी 

07

किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून समुद्राखालून धावणार आहे.

2015 

मध्येच या प्रकल्पाला सर्व आवश्यक परवानग्या केंद्र आणि राज्य सरकारांनी दिल्या आहेत. 

2022 

मध्ये देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट. 

वैशिष्ट्ये  

या बुलेट ट्रेनमध्ये 2 जादा प्रशस्त अशी प्रसाधनगृहे व्हील चेअरवर असलेल्या प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. त्याचबरोबर स्तनपानासाठी एक वेगळा डबा असेल. त्याचबरोबर आजारी प्रवाशांसाठी वेगळा विभाग तयार करण्यात येणार आहे. वॉल माऊंटेड प्रकारची युरिनल्स, त्याचबरोबर लहान मुलांसाठी वेगळी टॉयलेट तसेच कमोड पद्धतीची टॉयलेटस्ही असणार आहेत. 

विमानापेक्षा स्वस्त 

बुलेट ट्रेन म्हटले की, हा प्रवास खूप महागडा असेल, अशी सर्वसामान्यांची धारणा होती. त्याला छेद देत सरकारने सर्वांना परवडेल अशा किंमतीत बुलेट ट्रेनचा प्रवास होईल असे आधीच स्पष्ट केले आहे. राजधानी एक्स्प्रेसच्या दुसर्‍या श्रेणीतील वातानुकूलित डब्यात असणार्‍या सर्व सुविधा या बुलेट ट्रेनमध्ये मिळतील.

प्रवासी क्षमता   

जपानमध्ये सध्या धावत असलेली शिंकासेन ई-5 या बुलेट ट्रेनच्या धर्तीवर भारताच्या बुलेट ट्रेनची बांधणी असेल. सामान्य आणि विशेष श्रेणी असे 10 कोच या ट्रेनमध्ये असतील त्यातून 750 प्रवासी प्रवास करू शकतील. 24 बुलेट ट्रेन जपानातून येणार

24 बुलेट ट्रेन सुरूवातीला जपानहून मागवण्यात येतील. तर बाकीच्या ट्रेन भारतातच बांधल्या जाणार आहेत. दिवसाला या रेल्वेच्या 70 फेर्‍या होणार आहेत.  पुढे या ट्रेनला आणखी सहा डबे जोडून त्याची प्रवासी क्षमता 1250 वर नेण्यात येणार आहे. 2053 पर्यंत 35 बुलेट ट्रेन धावू शकतील, असे नियोजन आहे. पुढे ते 105 पर्यंत वाढवण्याचा रेल्वेचा विचार आहे. 

1 स्थानके : मुंबई ते अहमदाबाद हे अंतर 508 किलोमीटरचे आहे. त्यात 12 स्थानके असतील. मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, साबरमती

2 प्रवास, कालावधी आणि वेग ः बुलेट ट्रेन दोन पर्यायांमध्ये चालवण्यात येणार आहेत. पहिल्या पर्यायामध्ये सुरत आणि वडोदरा इतकीच मर्यादित स्थानके असतील. तर दुसर्‍या पर्यायामध्ये बुलेट ट्रेन सर्व 12 स्थानकांवर थांबणार आहे. मर्यादित स्थानकाच्या पर्यायामध्ये ही रेल्वे दोन तास सात मिनिटांमध्ये शेवटच्या स्थानकामध्ये पोहोचेल. तर सर्व स्थानकांवर थांबणारी रेल्वे 2 तास 58 मिनिटांचा वेळ घेईल. या ट्रेनचा कमाल वेग प्रतितास 350 किलोमीटरचा असेल. मात्र ही रेल्वे 320 च्या वेगाने धावेल. 

3 समुद्राखाली बोगदा : मुंबई ते अहमदाबाद या प्रवासादरम्यान एकूण 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून ही ट्रेन धावणार आहे. त्यातील 7 किलोमीटरचा बोगदा समुद्राखाली असेल.