Sun, Jul 12, 2020 17:55होमपेज › National › 'वायू' चक्रीवादळाने दिशा बदलली; गुजरातवरील धोका टळला?

'वायू' चक्रीवादळाने दिशा बदलली; गुजरातवरील धोका टळला?

Published On: Jun 13 2019 8:15AM | Last Updated: Jun 13 2019 8:36AM
अहमदाबाद/राजकोट : पुढारी ऑनलाईन

गुजरातच्या दिशेने सरकत असलेल्या वायू चक्रीवादळाने आज, गुरुवारी सकाळी आपली दिशा बदलली. गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्यापूर्वी हे वादळ समुद्राच्या दिशेला वळले आहे. यामुळे हे वादळ गुजरातमधील किनारपट्टीला धडकण्याची शक्यता नाही, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून किनारपट्टीजवळील ५०० गावांतील सुमारे ३ लाखांहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तसेच पश्चिम रेल्वेने गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या ७० रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.

वायू हे १९९८ नंतरचे सर्वात मोठे विध्वंसक वादळ आहे. कांडला येथे १९९८ मध्ये धडकलेल्या विध्वंसक वादळामुळे १,२४१ लोकांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये वादळाचा धोका लक्षात घेऊन बचावकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारणाची (एनडीआरएफ) ५२ पथके तैनात केली आहेत.

केंद्र सरकार गुजरातमधील स्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. गुजरातमधील १० जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालयांना आज आणि उद्या सुट्टी जाहीर केली आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वायू चक्रीवादळ गेल्या सहा तासांत उत्तर पश्चिम दिशेकडे सरकले आहे. हे वादळ सध्या गुजरातमधील वेरावल पासून १३० किलोमीटरवर तर पोरबंदरपासून १८० किलोमीटर अंतरावर घोंघावत आहे. हे वादळ सौराष्ट किनारपट्टीजवळून पुढे जाण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १३५-१४५ किलोमीटर राहील.

दरम्यान, वायू चक्रीवादळामुळे कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनार्‍यावर मोठ्या प्रमाणात उधाणाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांसाठी समुद्रकिनारे बंद ठेवण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. तसेच पुढील ४८ तासांत मच्छीमारांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्याचे आदेश देण्यात आहेत, अशी माहिती  राज्य आपत्ती निवारण कक्षाने दिली.