Wed, Jun 20, 2018 16:57



होमपेज › National › नक्षली हल्ल्यात 9 जवान शहीद

नक्षली हल्ल्यात 9 जवान शहीद

Published On: Mar 13 2018 2:54PM | Last Updated: Mar 13 2018 8:04PM



रायपूर : वृत्तसंस्था

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) नऊ जवान शहीद झाले आहेत. आयईडी स्फोटकांच्या सहाय्याने नक्षलवाद्यांनी आधी भू-सुरुंग स्फोट घडवून आणला व नंतर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात 10 जवान जखमी झाले असून, त्यापैकी काहीजणांची प्रकृती चिंताजनक आहे. 

सुकमा जिल्ह्यातील किस्तराम या ठिकाणी हा हल्‍ला झाला. सीआरपीएफच्या 212 बटालियनच्या जवानांकडून या भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरू होते. यावेळी येथील जंगलात दबा धरून बसलेल्या सुमारे 100 नक्षलवाद्यांनी जवानांना लक्ष्य केले. सुरुवातीला जवानांचे भू-सुरुंगविरोधी वाहन उडवून देण्यात आले. त्यानंतर बेछूट गोळीबार करण्यात आला. त्यात नऊ जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर दहा जवान जखमी झाले. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाचे जवान व नक्षलवाद्यांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.

आठवडाभरापूर्वी सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत 10 नक्षलवादी मारले गेले होते. गेल्यावर्षी 11 मार्च रोजी सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 12 जवान शहीद झाले होते. त्यानंतर 24 एप्रिल रोजी नक्षल्यांनी पुन्हा जवानांना टार्गेट केले होते. यामध्ये 25 जवान शहीद झाले होते.