...तर 'असे' शारीरिक संबंध हा बलात्कार नाही-सुप्रीम कोर्ट

Published On: Aug 22 2019 1:30PM | Last Updated: Aug 22 2019 1:34PM
Responsive image
file photo


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

दोघांमधील रिलेशनशिपचे लग्नामध्ये रुपांतर होणार  नाही, हे माहीत असूनही परस्पर सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध हा बलात्कार होऊ शकत नाही, असा महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. 

कोर्टाने म्हटले आहे की, लग्न होण्याबाबत अनिश्चितता असतानाही एखादी महिला संबंधित पुरुषाबरोबर परस्पर सहमतीने शारीरिक संबंध कामय ठेवत असेल तर ती त्याच्यावर बलात्काराचा आरोप करू शकत नाही.

याच आधारावर न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाने सेल्स टॅक्समधील साहाय्यक आयुक्तपदावरील महिलेची याचिका फेटाळून लावली. या महिलेने सीआरपीएफमध्ये डेप्युटी कमांडंट पदावरील एका अधिकाऱ्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. ते सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. तसेच ते अनेकवेळा एकमेकाच्या घरात राहिले आहेत. यामुळे या दोघांचे परस्पर सहमतीने शारीरिक संबंध होते, हेच स्पष्ट होते, असे कोर्टाने नमूद केले आहे. 

तक्रारदार महिलेने म्हटले होते की, ती सीआरपीएफ अधिकाऱ्याला १९९८ पासून ओळखते. त्याने २००८ मध्ये लग्नाचे वचन देऊन शारीरिक संबंध ठेवल्याचा तिचा आरोप आहे. या दोघांमध्ये २०१६ पर्यंत संबंध कायम राहिले. या काळात दोघे एकमेकांच्या घरी जाऊन एकत्र रहात होते. त्याने २०१४ मध्ये जातीच्या कारणावरून लग्न करण्यास नकार दिला. मात्र, रिलेशनशिप कायम ठेवली, असा दावा महिलेने केला आहे. दरम्यान, दुसऱ्या एका महिलेबरोबर साखरपुडा झाल्याचे त्याने सांगितले. यामुळे महिलेने त्याच्याविरोधात २०१६ मध्ये एफआयआर नोंदविली.     

यावर सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, खोटे वचन देऊन महिलेशी शारीरिक संबंध ठेवणे आणि परस्पर सहमतीने शारिरीक संबंध ठेवणे याबाबत गैरसमज आहेत. दोघांमधील रिलेशनशिपचे रुपांतर लग्नामध्ये होणार नाही, हे माहीत असूनही परस्पर सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध हा बलात्कार होऊ शकत नाही.