Sat, Aug 24, 2019 12:21होमपेज › National › राफेल प्रकरणी काँग्रेसचा सभात्याग

राफेल प्रकरणी काँग्रेसचा सभात्याग

Published On: Feb 12 2019 3:31PM | Last Updated: Feb 12 2019 3:30PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

राफेल व्यवहाराची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) मार्फत चौकशीची मागणी पुन्हा एकदा काँग्रेसने लोकसभेत केली. मात्र ही मागणी फेटाळून लावल्यानंतर काँग्रेसने सभात्याग केला. या मुद्यावरून विरोधकांनी घोषणा दिल्याने काहीवेळ गदारोळ झाला.

राफेलचा मुद्दा काँग्रेसने उचलून धरला आहे. आज, मंगळवारी (दि.१२) काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांनी राफेल प्रकरणी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांना त्यांना या विषयावर बोलण्यास परवानगी दिली नाही. त्यानंतर नाराज झालेल्या खरगे यांनी, हे काय आहे? आम्हाला जेपीसीमार्फत चौकशी हवी आहे, अशी मागणी केली. यावेळी खरगे यांच्या बाजूला सोनिया गांधी बसल्या होत्या. त्यांनीही खरगे यांना समर्थन दिले.
संरक्षण मंत्रालयाबाबतचा कॅग अहवाल राज्यसभेत सादर झाला आहे. आणि तो लीक झाला आहे. मात्र, हा अहवाल लोकसभेत सादर झालेला नाही, असा दावा खरगे यांनी केला. त्यावर लोकसभा सभापती महाजन यांनी, कॅग अहवाल लोकसभेत सादर झाला असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी बोलताना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी, राफेल मुद्यावर सभागृहात चर्चा झाली आहे आणि राफेलबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. जेपीसी चौकशीला पंतप्रधान घाबरत आहेत. आमची मागणी मान्य केली जात नसल्याने आम्ही सभात्याग करत असल्याचे खरगे यांनी सांगितले.