Sun, Aug 25, 2019 01:30होमपेज › National › काँग्रेस म्‍हणते पंतप्रधान पद मिळाले नाही तरी चालेल पण...

काँग्रेस म्‍हणते पंतप्रधान पद मिळाले नाही तरी चालेल पण...

Published On: May 16 2019 12:43PM | Last Updated: May 16 2019 12:28PM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

केंद्रातून भाजपला हद्दपार करण्यासाठी काँग्रेसने नवी खेळी करत पंतप्रधान पदावर पाणी सोडण्याची तयारी दाखवली आहे. तसे स्पष्ट सुतोवाच काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी  केले आहेत. स्वबळावर सत्ता न मिळाल्यास आघाडीसाठी प्रयत्न केले जातील, यासाठी पंतप्रधान पद सोडावे लागले, तरी हरकत नाही असे आझाद म्हणाले. 

काही झाले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्‍वाखालील एनडीए सरकारला केंद्रात सत्‍ता स्‍थापण्यापासून रोखणे हे पक्षाचे एकमेव लक्ष असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगितले. दरम्‍यान, यावेळी बोलताना आझाद यांनी आम्‍ही आमची भूमिका जाहीर केली आहे. 

जर महाआघाडीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्‍वाला सहमती मिळत असेल, तर काँग्रेस नेतृत्‍व स्‍वीकारेल असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. पुन्हा एनडीएचे सरकार केंद्रात स्‍थापन होऊ नये हाच आमचा एकमात्र उद्‍देश असणार आहे असे सांगत महाआघाडीत सर्वाच्या सहमतीनेच पंतप्रधान पदावर शिक्कामोर्तब केले जाईल, असे आझाद म्हणाले. 

काँग्रेसला स्वबळावर सत्ता दुरापास्त दिसत असली मागच्या तुलनेत अधिक जागा मिळविण्याची आशा आहे. दुसरीकडे पक्षाचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी स्वबळावर सत्ता शक्य नसल्याचे सुतोवाच केले होते. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी येत्या २१ मे ला विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत निकालानंतर कोणती व्यूहरचना आखायची यावर खलबते केली जाणार आहेत.