Sun, Aug 25, 2019 01:32होमपेज › National › 'सरन्यायाधीशांच्या राजीनाम्यासाठी कारस्थान'

'सरन्यायाधीशांच्या राजीनाम्यासाठी कारस्थान'

Published On: Apr 24 2019 10:25AM | Last Updated: Apr 24 2019 10:25AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यासाठी त्यांना लैंगिक छळाच्या प्रकरणाता गोवण्यात आल्याचा दावा एका वकिलाने केला आहे. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने उत्सव सिंग बेन्स या वकिलाकडून म्हणणे मागवले आहे. न्या. अरुण मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पीठाने वकील उत्सव सिंग बेन्स यांना नोटीस जारी केली.

सर्वोच्च न्यायालयातील माजी कर्मचारी महिलेने तिची बाजू मांडण्यासाठी आपल्याला मोठ्या रकमेचे आमिष दाखवले होते. सरन्यायाधीशांविरोधात प्रेस क्लब ऑफ इंडियात पत्रकार परिषद घेण्यासाठी आपल्याला १.५ कोटी रुपये देऊ केले होते, असा दावा या वकिलांने केला आहे. न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याशी हे प्रकरण निगडित असल्याने सर्वोच्च न्यायालयाने याची लगेच दखल घेतली. तसेच हे प्रकरण आज सुनावणीस घेण्यात येणार आहे.

सरन्यायाधीश गोगोई यांनी माझ्यावर लैंगिक छळाचे आरोप करण्याच्या या प्रकरणात मोठा कट आहे व या आरोपांना उत्तर देऊ असे शनिवारच्या सुनावणीवेळी स्पष्ट केले होते. त्यानंतर वकील बेन्स यांनी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी एक प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यात म्हटले आहे की, या प्रकरणी करण्यात आलेले आरोप ऐकून धक्का बसला व आपण सदर तक्रारदाराची बाजू मांडण्याची तयारी दर्शवली होती, पण जेव्हा अजय या व्यक्तीने सगळा घटनाक्रम सांगितला तेव्हा त्यात अनेक त्रुटी व विरोधाभास दिसून आले. नंतर तक्रारदाराचे दावे तपासून पाहण्यासाठी भेट घडवून आणण्याची विनंती केली असता तसे करण्यास नकार देण्यात  आला त्यातून संशय निर्माण होत गेला. सरन्यायाधीशांना अडकवण्यासाठी ५० लाखांचा देकार अजय याच्याकडून ठेवण्यात आला असताना तो फेटाळला पण नंतर त्याने १.५ कोटी रुपये देऊ केले. त्यावेळी अभिसाक्षी या नात्याने आपण त्याला कार्यालयातून चालते होण्यास सांगितले.

सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकरणांच्या निकालांचे फिक्सिंग केले जाते. त्यासाठी पैसे घेतले जातात. हे रॅकेट सरन्यायाधीशांनी मोडून काढले होते त्यामुळे फिक्सर्सचा त्यांच्यावर राग आहे व त्यातूनच हे प्रकरण झाले आहे, असा दावा या वकिलांनी केला आहे.