'तर दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या'

Published On: Aug 22 2019 3:41PM | Last Updated: Aug 22 2019 6:48PM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयने काल, बुधवारी रात्री त्यांच्या जोरबाग येथील निवासस्थानात नाट्यमयरित्या अटक केली. यावर काँग्रेस पक्षाने तीव्र संताप व्यक्त केला. गेल्या दोन दिवसांमध्ये दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या झाली असल्याचे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

सुरजेवाला म्हणाले, 'सत्ताधारी सीबीआय, ईडीचा गैरवापर करून विरोधकांना शांत करण्याच्या उद्देशाने त्यांच्या वरिष्ठ राजकीय नेत्यांवर खोटे आरोप लावत आहे. तसेच गेल्या दोन दिवसांमध्ये दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या झाली आहे. चिदंबरम यांच्यावर अटकेची कारवाई ही सुडभावनेने केली असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. 

चिदंबरम यांच्या अटकेनंतर त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी देखील संतप्त प्रतिक्रीय दिली आहे.  ट्विट करत कार्ती यांनी सरकारवर निशाणा साधला. 

'सीबीआयची कारवाई राजकीय सूडबुद्धीने प्रेरित आहे. काही लोकांना खूश करण्यासाठी सीबीआय ऐवढे मोठे नाटक आणि तमाशा करत आहे, अशी टीका कार्ती चिदंबरम यांनी केली आहे. तसेच कलम ३७० वरून लक्ष विचलित करण्यासाठी पी. चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.