Sun, Sep 22, 2019 22:01होमपेज › National › त्रिशंकू परिस्थितीत गैर भाजप सरकार स्थापनेसाठी चंद्राबाबू - ममतांची खलबते

त्रिशंकू परिस्थितीत गैर भाजप सरकार स्थापनेसाठी चंद्राबाबू - ममतांची खलबते

Published On: May 20 2019 9:37PM | Last Updated: May 20 2019 9:37PM
कोलकाता : पुढारी ऑनलाईन

एक्झिट पोलनंतर विरोधकांमध्ये हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रादेशिक पक्षांच्या संपर्कात आहेत. तर आंध्रचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. लोकसभेचा निकाल त्रिशंकू लागल्यास गैर भाजप सरकार स्थापन करण्याबाबत यावेळी दोघा नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.

नायडू आणि ममता यांच्यात सुमारे ४५ मिनिटे चर्चा झाली. यावेळी भाजप विरोधातील महाआघाडीची आगामी रणनिती काय असेल, यावर खलबते झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

याच, दरम्यान समाजवादीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही ममतांना फोन करून आगामी रणनितीवर चर्चा केली.

विरोधकांच्या महाआघाडीसाठी चंद्राबाबू नायडू अधिक सक्रिय झाले आहेत. नायडू यांनी याआधी समाजवादीचे अखिलेश यादव, बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.

लोकसभेचा निकाल २३ मे रोजी जाहीर झाल्यानंतर दिल्लीतही आगामी रणनितीवर चर्चा करण्यासाठी ममता बॅनर्जी दिल्लीला जाणार असल्याचे समजते. दरम्यान, शरद पवार हे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. मात्र, पटनायक यांनी अद्याप आपले पत्ते खुले केलेले नाही.

लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच लोकसभेच्या ५४२ जागांच्या एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर झाले. आठ एक्झिट पोलपैकी सहा एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. या एक्झिट पोलनंतर विरोधकांची चिंता वाढली आहे.