Sun, May 26, 2019 14:42होमपेज › National › ब्‍लॉग : 'ब्रेकिंग'साठी पुन्‍हा मानवतेचा बळी!

ब्‍लॉग : मरण 'अटल' पण 'ब्रेकिंग' नको!

Published On: Jun 14 2018 11:34AM | Last Updated: Jun 14 2018 2:22PMशंकर पवार, पुढारी ऑनलाईन

 

माध्यमांना समाजाचा आरसा, असं संबोधलं जातं. समाजात जे काही भलं बुरं घडत असेल ते अगदी जशंच्या तसं दाखवायचं काम माध्यमांनी करावं, अशी अपेक्षा असते. सध्याचा काळ हा वेगवान आहे. जग अगदी प्रत्येकाच्या मुठीत सामावलं आहे. त्यामुळे माध्यमांच्या दुनयेतही वेगाला फारच महत्त्‍व आलं आहे. काही क्षणात जगभरातील कोणतीही बातमी आपल्याला समजते. पण, हा वेग काहीवेळा धोकादायकही ठरतानाचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. सोशल मीडियाने तर यात आततायीपणाचा कळस केला आहे. 

काही दिवसांपूर्वीच महाराष्‍ट्रातील लावणी जगभर पोहोचविणार्‍या लावणी कलाकार मंगला बनसोडे यांना माध्यमांसमोर येऊन आपण जिवंत आहे, हे सिद्ध करावं लागलं. सध्या देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी मुत्रसंसर्गामुळे रुग्‍णालयात आहेत. परंतु, सोशल मीडियावर त्यांच्या निधनाच्या वृत्ताचं पेव फुटलं आहे. काही क्षणात अनेकांचा उतावळ्या भावना कोणतीही शहानिशा न करता बाहेर पडताना दिसत आहेत. एखाद्या भारतरत्‍न व्यक्‍तीचा जिवंतपणी एवढा मोठा अपमान या आततायी माध्यमांमुळे सुरु आहे. सोशल मीडियाने तर यात कडी केली आहे. 

तसं पाहिलं तर असे प्रकार आपल्याकडे पहिल्यांदाच घडतायत असं नाही. लोकशाहीचा चौथा आधार असणार्‍या या माध्यमांनी अनेकदा अनेकांना आपल्या उतावळेपणाने निराधार केल्याची उदाहरणे आहेत. काही दिवसांपूर्वीचं मंगला बनसोडे यांचं उदाहरण याचा चांगला नमुना म्‍हणावं लागेल. बनसोडे यांच्या पतीचं निधन झालं. मात्र, सोशल मीडिवर मंगला बनसोडे यांचं निधन झाल्याची अफवा जोरात पसरली. श्रद्धांजलीचे संदेशही धडाधड सोशल मीडियावर धडकले. परंतु, वास्‍तव जाणून घेण्याचा कोणीही विचार केला नाही. अखेर स्‍वत: मंगलाताईना माध्यमांना सामोरे जात "मी जिवंत आहे," असं सांगावं लागलं.

असंच काहीसं छत्तीसगडमधील प्रसिद्ध पंडवानी गायिका पद्मभूषण तीजन बाई यांच्या बाबतीत घडलं. दिवसभर त्यांच्या निधणाच्या बातम्या माध्यमांनी चालवल्या. परंतु, वास्‍तव हे होतं की त्यांना प्रकृती अस्‍वास्‍थ्यामुळं रुग्‍णालयात दाखल करण्यात आलं होतं. खर्‍या घटनेची साधी चौकशीही न करता व्‍हॉट्‍स ॲपच्या विद्यापीठानं या अफवेवर बातमी म्‍हणून शिक्‍कामोर्तब केलं. आणि वार्‍यासारखी ही बातमी राज्य आणि देशभरात पसरली. मुख्य प्रवाहातील माध्यमंही अशी चुकतात म्‍हटल्यावर ज्यावर कोणाचंही नियंत्रण नाही, अशा सोशल मीडियाबद्दल न बोललेलंच बरं. 

सोशल मीडियाच्या उतावळेपणाचा आणि एकप्रकारच्या चारित्र्य हणनाचा अनुभव केवळ एवढ्यांनाच आला असं नाही तर देशात 'ब्रेकिंग'चे बळी अनेकजण ठरले आहेत. अमिताभ बच्‍चन, विनोद खन्‍ना, जॉनी लिवर यासारख्या दिग्‍गजांनाही अशा प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. एखादी कपोलकल्‍पित बातमी सोशल मीडियावर आली की, ही घटना आपल्यालाच पहिल्यांदा माहिती झाली अशा अविर्भावात ब्रेकिंग न्यूज म्‍हणून पुढच्याला पाठविण्यात अनेकांना धन्यता वाटते. परंतु, शिकलेल्यांचं हे अडाणीपण अनेकांना त्रासदायक ठरतं याचं कुणालाही भान नसतं. किमान खात्री करण्याची तसदीही कुणी घेत नाही. 

►जाणून घ्या 'पुणेरी पगडी'विषयी...

सोशल मीडियावर 'बघा, वाचा अन पुढे पाठवा' या कामासाठी मोठा वर्ग फुकटात काम करत असतो. एखाद्या मॅसेजवर विचार करण्याची तसदी कुणालाही नको असते. तेवढा वेळही कुणाला नसतो (?) कारण तोपर्यंत आपल्याला मिळालेली ब्रेकिंग इतरांना लवकर समजणार नाही, असा काहीसा भाव. यामुळे स्‍वत:च्या मरणाच्या बातम्या स्‍वत:च्या डोळ्यांनी पाहण्याचं दुर्दैव अशा प्रकारांमुळे अनेकांवर ओढावलं आहे. या घटनांमुळे कित्येकांना मानसिक तणावाला सामोरं जावं लागलं आहे. 

याबाबत छापील माध्यमांवर अजूनही लोकांचा विश्‍वास आहे. परंतु, ही विश्वासार्हता इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांना टिकवता आलेली नसल्याचे चित्र आहे. सोशल मीडिया जेवढा लाभदायी आहे तेवढाच धोकादायकही आहे. त्यामुळे वापरणार्‍याच्या विवेकावर त्याची उपयुक्‍तता अवलंबून आहे. अन्यथा तो अनेकांना त्रासदायक ठरू शकतो आणि समजमनाच्या आरशावरचा आणि लोकशाहीच्या आधारस्‍तंभाच्या विश्वासार्हतेला धक्‍का पोहोचू शकतो. त्यामुळे सोशल मीडियावर 'बघा, वाचा, खात्री करा आणि मग पुढे पाठवा' ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. 

काहीही असो परंतु अटलजींबाबत घडलेला प्रकार मनाला चटका लावून जाणारा आहे. मुळात अटलजी मृत्यूनं संपणारे नाहीत आणि अफवेने खचणारेही नाहीत.  त्यांना आणखी दीर्घायुष्य लाभो! 

मृत्यूलाही आव्‍हान देणारे अटलजी आपल्या कवितेतून म्‍हणतात,

 मैं जी भर जिया, मन से मरॅूं ।
लौटकर आऊँगा, कुछ से क्यों डरॅूं?

तू दबे पाँव, चोरी-छिपे से न आ ।
सामने वार कर, फिर मुझे आजमा ।।

मौत से बेखबर, जिंदगी का सफर ।
शाम हर सुरमई, रात बंसी का स्‍वर ।।