होमपेज › National › 'तर पानिपतमध्ये पराभवानंतर मराठ्यांची जी अवस्था झाली तीच देशाची होईल'

'तर पानिपतमध्ये पराभवानंतर मराठ्यांची जी अवस्था झाली तीच देशाची होईल'

Published On: Jan 11 2019 10:25AM | Last Updated: Jan 11 2019 7:15PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

राजधानी दिल्लीमधील रामलीला मैदानावरून भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गेल्या साडे चार वर्षातील कामगिरीचे मुल्यमापन करत काँग्रेसवर तुफानी प्रहार केला. आगामी लोकसभा निवडणूक वैचारिक युद्ध असल्याचे अमित शहा यांनी नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) एकजूट असल्याचा दावा केला.  

अमित शहा म्हणाले की, विरोधी पक्षांजवळ ना नेते आहेत ना नीती आहे, मराठ्यांचा पानिपतमध्ये पराभव झाल्यानंतर देश २०० वर्षांसाठी गुलाम झाला. आगामी निवडणुकमध्येही तीच स्थिती असणार आहे. देशात २०१४ मध्ये भाजपची सहा राज्यामध्ये सत्ता होती, पण आता १६ राज्यांमध्ये आमची सत्ता आहे. शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांना मोदी सरकार  निवडून आणण्याचा आदेश दिला.

संपूर्ण जगामध्ये मोदींसारखा नेता जगातील कोणत्याच पक्षाजवळ नाही, असा दावाही शहा यांनी केला. त्यांनी प्रस्तावित महाआघाडीवरही टीकास्त्र सोडले. गरीब कल्याण व सांस्कृतिक राष्ट्रवादासोबत भाजपची वाटचाल सुरू आहे, पण विरोधक केवळ सत्तेसाठी एकत्र येत आहेत.

शहा यांनी राम मंदिर मुद्यावरही भाष्य केले. अयोध्येत राम मंदिराची लवकरात निर्माण व्हावे अशी भाजपची भूमिका असल्याचे शहा म्हणाले. यावेळी कार्यकर्त्यांना राम गजराचे नारे दिले. राम मंदिरासाठी भाजप कटीबद्ध आहे. 

दोन दिवस चालणाऱ्या अधिवेशनाच्या समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या अधिवेशनात राम मंदिर, बेरोजगारी, आर्थिक दुर्बल घटकाना आरक्षण हे प्रमुख मुद्दे असणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत जनतेसमोर कोणते मुद्दे घेऊन जाणार, प्रचारतंत्र, सोशल मीडिया आदी मुद्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. 

या अधिवेशनात आगामी निवडणूक या मुद्यावर अधिक विशेष फोकस असणार आहे. विविध राज्यांतील भाजप नेते पक्षाच्या रणनितीवर चर्चा करणार असल्याचे समजते. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला. त्यानंतर केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना शिक्षण आणि नोकर्‍यांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. आता भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे.