Thu, Aug 22, 2019 15:13होमपेज › National › 'त्या' शापामुळेच दहशतवाद्यांनी त्यांना मारले; शहीद हेमंत करकरेंबद्दल प्रज्ञा सिंहचे वादग्रस्त वक्तव्य

'त्या' शापामुळेच दहशतवाद्यांनी त्यांना मारले; शहीद हेमंत करकरेंबद्दल प्रज्ञा सिंहचे वादग्रस्त वक्तव्य

Published On: Apr 19 2019 12:12PM | Last Updated: Apr 19 2019 12:38PM
भोपाळ : पुढारी ऑनलाईन

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी राहिलेल्या आणि सध्या मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभेच्या जागेवरील भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुंबई हल्ल्यातील शहीद एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबाबतीत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटले आहे की, त्यांनी मला चुकीच्या पद्धतीने फसविले. मी त्यांना म्हटले होते की तुमचा सर्वनाश होईल आणि ते आपल्या कर्मांने मेले. त्यांच्या या वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.

भोपाळमधून उमेदवारी दिल्यानंतर प्रज्ञा सिंह यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हेमंत करकरे यांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने फसविले, असा आरोप प्रज्ञा ठाकूर यांनी त्यात केला आहे. ''मी त्यांना म्हटले होते की तुझा सर्वनाश होईल. मी ज्यावेळी तुरुंगात गेले त्या दिवसांपासून त्यांना सूतक लागले आणि ज्यावेळी त्यांना दहशतवाद्यांनी मारले तेव्हा सूतक संपले'', असे वादगस्त वक्तव्य प्रज्ञा ठाकूर यांनी केले आहे.    

राज्याला हादरवून सोडणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी राहिलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये नुकताच प्रवेश केला आहे. जहाल हिंदूत्वाच्या पुरस्कर्त्या असलेल्या प्रज्ञा सिंह यांना भोपाळमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. 

मुंबईवर झालेल्या हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाले. तर प्रज्ञा ज्या खटल्यात आरोपी होत्या; त्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करकरे यांच्याकडे होता. करकरे १९८२ मध्ये आयपीएस अधिकारी बनले होते. महाराष्ट्र संयुक्त पोलिस आयुक्त पदावरून त्यांना एटीएस प्रमुख बनविले होते. ते शहीद झाल्यानंतर त्यांना भारत सरकारने मरणोत्तर अशोक चक्रने सन्मानित केले होते.