सावत्र आईच्या त्रासामुळे वडिलांची आत्महत्या; भय्‍यू महाराजांच्या मुलीचा आरोप | पुढारी होमपेज › National › सावत्र आईच्या त्रासामुळे वडिलांची आत्महत्या; भय्‍यू महाराजांच्या मुलीचा आरोप

सावत्र आईच्या त्रासामुळे वडिलांची आत्महत्या; भय्‍यू महाराजांच्या मुलीचा आरोप

Published On: Jun 14 2018 1:46AM | Last Updated: Jun 14 2018 11:26AMइंदूर : वृत्तसंस्था

भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. दुसरी पत्नी आणि पहिल्या पत्नीची मुलगी यांच्यातील वादामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असावे काय, असे बोलले जात आहे.

भय्यूजी महाराजांच्या पहिल्या पत्नीची मुलगी कुहू हिने सावत्र आईवर आरोप केले आहेत. कुहू ही भय्यूजी महाराजांची पहिली पत्नी माधवीची मुलगी आहे. त्यांची दुसरी पत्नी आयुषी आणि कुहू यांच्यात सख्य नव्हते. सावत्र आईमुळेच माझ्या वडिलांनी आत्महत्या केली, असा आरोप कुहूने केला आहे. तर कुहूला मी आवडत नसल्याने ती असे आरोप करत आहे, असे आयुषी यांनी म्हटले आहे. 

भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येनंतर त्यांचे वारसदार म्हणून ज्या सेवकाचे नाव पुढे आले आहे, तो पारनेर तालुक्यातील लोणी हवेलीचा आहे. विनायक काशिनाथ दुधाडे असे त्याचे नाव आहे. त्याचे वडील काशिनाथ दुधाडे यांच्यानंतर विनायक गेल्या 20 वर्षांपासून भय्यूजी महाराजांच्या सेवेत आहे. भय्यूजी महाराजांनी विनायकवर आपल्या सर्व मालमत्ता व गुंतवणुकीची जबाबदारी सोपवली आहे.

काशिनाथ दुधाडे हे नोकरीच्या निमित्ताने इंदूरला गेले होते. नंतर ते भय्यूजी महाराजांच्या संपर्कात आले आणि त्यांचे सेवक झाले. दोन-तीन वर्षांनंतर त्यांचा मुलगा विनायक हा देखील आश्रमात भय्यूजींचा साधक झाला. 

भय्यू महाराज यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ‘परिवाराची जबाबदारी घेण्यासाठी कोणीतरी पाहिजे, मी तणावात आहे, थकलो आहे, विनायक माझा विश्‍वासपात्र आहे, सर्व गुुंतवणूक व मालमत्तेची जबाबदारी तोच सांभाळेल. कोणीतरी परिवाराची जबाबदारी सांभाळावी लागेल, ती विनायकच पूर्ण करेल. माझा त्याच्यावर पूर्ण विश्‍वास आहे, असे नमूद आहे.