Thu, Sep 21, 2017 23:19होमपेज › National › रामरहीमकडे होती विषकन्यांची फौज

रामरहीमकडे होती विषकन्यांची फौज

Published On: Sep 14 2017 2:17AM | Last Updated: Sep 14 2017 1:34AM

बुकमार्क करा

चंदिगड : वृत्तसंस्था

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित रामरहीम याला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर अनेक गुपिते उघड होऊ लागली आहेत. डेर्‍यात रामरहीमसाठी विषकन्यांचा एक ग्रुप होता. सुंदर मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांना रामरहीमच्या गुहेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या विषकन्यांवर सोपवण्यात आली होती. 

डेर्‍यात एखादी तरुणी रामरहीमच्या विरोधात तर बोलत नाही ना, याकडे विषकन्यांचे लक्ष असायचे. विरोध करणार्‍यांना 24 तास अन्न आणि पाणी दिले जात नसे. ज्या तरुणी शेवटपर्यंत नकार देत असत, त्यांना सुधार खोलीत पाठवले जात असे. तिथे त्यांना खुर्चीला बांधून मारहाण केली जात असे. ज्या तरुणी आदेशाचे पालन करण्यास नकार देत असत, त्यांनाही ही शिक्षा दिली जात असे. ज्या तरुणी रागाने पाहताना आढळत असत, त्यांच्या चेहर्‍यावर काळे फासून गाढवावरून धिंड काढली जात असे.

रामरहीमला शिक्षा होण्यामध्ये गुरदास सिंह टूर नावाच्या व्यक्तीची मुख्य भूमिका आहे. ते सीबीआयचे साक्षीदार होते. विषकन्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. काही विषकन्या अद्यापही डेर्‍यात उपस्थित आहेत. त्यामधील एक विषकन्या गरोदर होणार्‍या अनुयायांचा गर्भपात करण्याचे काम करते, असा दावा त्यांनी केला आहे.

एकेकाळी डेर्‍याशी संबंध असलेल्या या साध्वीनेही एका रात्री तिलाही रामरहीमच्या गुहेत पाठवण्यात आल्याची माहिती सांगितली. गुहेत गेल्यानंतर रामरहीमच्या घाणेरड्या हेतूची कल्पना आल्यानंतर तिने मासिक पाळीचे कारण दिले व बाबाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. 

रामरहीमची शिकार होण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी डेर्‍यातील साध्वी मासिक पाळीचे कारण देऊन स्वतःची सुटका करत असत, असेही या साध्वीने सांगितले आहे. दोन साध्वींवर आश्रमात बलात्कार करणार्‍या बाबा रामरहीमला सीबीआय न्यायालयाने 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

  पूर्वी डेर्‍यातच राहणार्‍या एका साध्वीने एका टीव्ही चॅनेलसोबत बोलताना असा गौप्यस्फोट केला आहे की, रामरहीम आवडत्या मुलींना रोज रात्री 11 वाजता आपल्या गुहेत बोलवायचा. रामरहीमच्या बोलवण्यावरून मुली गुहेत तर जायच्या; पण त्या तोंडातून ब्रदेखील काढू शकत नव्हत्या. जर तुम्ही रामरहीमची इच्छा पूर्ण केली नाही, तर तुमच्या नातेवाईकांना जीवे मारण्यात येईल, अशा पद्धतीने मुलींना घाबरवण्यात यायचे.