Tue, Oct 24, 2017 16:49होमपेज › National › तलवार दाम्‍पत्‍याला कोर्ट ऑर्डरची प्रतीक्षा

तलवार दाम्‍पत्‍याला कोर्ट ऑर्डरची प्रतीक्षा

Published On: Oct 13 2017 4:47PM | Last Updated: Oct 13 2017 4:47PM

बुकमार्क करा

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

बहुचर्चित आरुषी-हेमराज हत्‍या प्रकरणी सबळ पुराव्‍यांअभावी राजेश तलवार आणि नुपूर तलवार यांची अलाहाबाद हायकोर्टाने काल दि. १३ रोजी सुटका केली. त्‍यानंतर आज तलवार दाम्‍पत्‍य तुरुंगातून बाहेर येण्‍याची शक्‍यता वाटत होती. मात्र, याबाबत तुरुंग अधिकार्‍यांनी कोर्टाकडून अद्‍याप ऑर्डर आली नसल्‍याचे म्‍हटले आहे, ही माहिती सूत्रांनी दिली आहे. 

काल निकालावेळी आरुषीची हत्‍या तिच्‍या आई-वडिलांनी केली नसल्‍याचे म्‍हणत न्‍यायालयाने राजेश तलवार आणि नुपूर तलवार यांची सुटका केली होती. तलवार दाम्‍पत्‍यांविरोधात सबळ पुरावे नसल्‍याचे अहमदाबाद न्‍यायालयाने म्‍हटले होते. 

मे २००८ मध्ये नोएडातील जलवायू विहार परिसरात १४ वर्षांच्या आरूषीचा मृतदेह घरात आढळून आला होता. धारधार शस्त्रांनी तिचा गळा चिरुन हत्‍या करण्यात आली होती. ही हत्‍या हेमराजने केली असावी, असा संशय होता. पण, दोन दिवसानंतर घराच्या गच्चीवर त्याचाही मृतदेह आढळला. यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले. या प्रकरणात आरुषीचे आई-वडिल राजेश तलवार आणि नुपूर तलवार यांना दोषी ठरवण्‍यात आले होते. तलवार दाम्‍पत्‍यांना जन्‍मठेपेची शिक्षाही झाली होती. मात्र, सीबीआय न्‍यायालयाने दिलेल्‍या निर्णयाविरोधात राजेश आणि नुपूर तलवार यांनी अलाहाबाद हायकोर्टात अपील केले होते.

देशभरातील माध्यमांमध्ये चर्चिल्या गेलेल्या या प्रकरणामुळे उत्तर प्रदेश पोलिसांवर मोठा दबाव आला होता. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले होते. या प्रकरणाचा तपासही सीबीआयच्या दोन पथकांनी केला होता.