होमपेज › National › देशाला आत्मनिर्भर करण्याचा संकल्प करुया: मोदी

देशाला आत्मनिर्भर करण्याचा संकल्प करुया: मोदी

Last Updated: Jun 02 2020 11:51AM
नवी दिल्ली - पुढारी ऑनलाईन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सीआयआयच्या उद्योजकांना आत्मनिर्भर होण्यासाठी आवाहन केले आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी त्यांचे उत्पादन अशा प्रकारे करु या की आपल्याला सर्वसामान्य गोष्टींसाठी इतर देशांच्यावर अवलंबून राहायला नको. त्यासाठी या उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी मोठे पॅकेज दिले आहे. त्याचा उपयोग करुन उद्योगांनी लोकांना हव्या तशा प्रकारच्या वस्तूंची निर्मिती करुन मेड इन इंडियाचा प्रचार आणि प्रसार करावा. त्यासाठी सरकार आपल्या सोबत असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.

लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी २०० कोटी रुपयांची सरकारने खरेदी केल्याची माहिती मोदींनी दिली. तसेच ग्लोबल टेंडर हटवल्याचेही त्यांनी सांगितले. देशाच्या संरक्षण क्षेत्रातही खासगी उद्योजकांना सामावून घेण्याचे धोरण ही आता वास्तविकता झाली आहे. उद्योगांना अवकाश क्षेत्रात आणि अणुऊर्जेच्या क्षेत्रातही काही करावयाचे असेल तर त्यासाठीही ही क्षेत्रे खुली करण्यात आली आहेत.

उद्योग जगताला सर्वच क्षेत्रात देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावता येणार आहे. मग ते खाणकाम, ऊर्जा असो की संशोधन तंत्रज्ञानाचे क्षेत्र असो ही सर्वच क्षेत्रे उद्योग जगताला खुली केली आहेत. तरुणांच्यासाठीही मोठ्या प्रमाणात उद्योगाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत असेही मोदींनी यावेळी सांगितले.

तसेच, मोदी यांनी यावेळी  ‘५ आय’ हा नवा फॉर्म्युला सांगितला. हेतू, समावेश, गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि नाविन्य अशा पाच गोष्टीवर लक्ष देणे अधिक गरजेचे असल्याचे मोदी यांनी म्हटले.