Mon, Aug 26, 2019 15:03होमपेज › National › बडतर्फ जवान तेज बहादूर यांच्या याचिकेवर पीएम मोदींना नोटीस

बडतर्फ जवान तेज बहादूर यांच्या याचिकेवर पीएम मोदींना नोटीस

Published On: Jul 20 2019 2:09PM | Last Updated: Jul 20 2019 1:42PM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीमधील खासदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोटीस बजाविली. ही नोटीस न्यायमूर्ती एम. के. गुप्ता यांच्या खंडपीठाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बजावली असून त्यावर 21 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

याबाबत याचिका बीएसएफचे माजी सैनिक तेज बहादूर यादव यादव यांनी दाखल केली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून त्यांचा उमेदवारी अर्ज बाद केल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासदारकीला आव्हान दिले होते.

वाराणसीमधून तेजप्रताप यादव यांनी समाजवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु निवडणूक आयोगाने सभ्य वर्तवणुकीचा दाखला न दिल्याचे अयोग्य कारण देत उमेदवारी अर्ज रद्‌द केल्याचा आरोप केला आहे. या याचिकेची दाखल घेत उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोटीस बजाविली आहे.

अर्ज का बाद करण्यात आला होता ?

तेजबहादूर यांनी २४ एप्रिल रोजी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात सीमा सुरक्षा दलातून बडतर्फ करण्यात आल्याचा उल्लेख केला होता. मात्र, समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी २९ एप्रिलला दाखल केलेल्या अर्जात हा उल्लेख केलेला नाही. तसेच त्यांना सीमा सुरक्षा दलातून (बीएसएफ) बडतर्फ करण्यात आल्याची कारणे नमूद करणारे ‘बीएसफ’चे ना-हरकत प्रमाणपत्र त्यांनी अर्जासोबत जोडणे आवश्यक होते. तेजबहादूर यांच्या उमेदवारी अर्जातील विसंगती आणि त्रुटीबाबत १ मे रोजी निवडणूक अधिकाऱ्यांपुढे सुनावणी झाली. त्यावेळी त्यांचा अर्ज बाद करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते.

एका व्हिडिओमुळे तेज बहादूर यादव आले होते चर्चेत 

तेज बहादूर यादव यांनी २०१७ ला सोशल मीडियावर बॉर्डरवर जवानांना निकृष्ठ दर्जाचे जेवण मिळत असल्याचा आरोप करणारा व्हिडिओ टाकला होता. या व्हिडिओनंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशीही झाली. चौकशीनंतर तेज बहादूर यांच्यावर चुकीचे आरोप केल्याप्रकरणी त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले होते. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी चौकशीत कसूर केल्याचा आरोप तेज बहादूर यांनी केला होता.