Tue, Jul 23, 2019 12:42होमपेज › National › अंबानींसाठी करार बदलला

अंबानींसाठी करार बदलला

Published On: Apr 16 2019 2:14AM | Last Updated: Apr 15 2019 10:20PM
महुआ (गुजरात) : पीटीआय 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती अनिल अंबानींना 30 हजार कोटीचा फायदा करून देता यावा यासाठीच राफेल करारात बदल केला, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. नरेंद्र मोदींचे होमग्राऊंड गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील प्रचारसभेत ते बोलत होते. 

राहुल म्हणाले, ‘यूपीए’ काळातील करारात राफेल एअरक्राफ्ट हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे बनवण्याचे ठरले होते; पण नरेंद्र मोदींनी करार बदलला. 36 विमाने फ्रान्समधील डसॉल्ट कंपनीकडून चढ्या भावाने घ्यावी लागतील. अनिल अंबानींना फायटर जेट बनविण्याचा कोणताही अनुभव नसताना त्यांना 30 हजार कोटी का दिले, याचे उत्तर मोदींनी द्यावे. फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी मला सांगितले की, मोदींनी फ्रान्सला भेट देऊन 526 कोटींचे विमान 1600 कोटींना विकत घेऊ, असे  सांगितले. मोदी हे गरिबांचे चौकीदार नाहीत, तर श्रीमंतांचे आहेत. 

ते म्हणाले, काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्‍वासनातील ‘न्याय’ योजनेसाठीचे पैसे भारतीय बँकांना चुना लावून पळून गेलेल्या नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि विजय मल्ल्या यांच्या खिशांतून वसूल करू. नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये देण्याचे जे खोटे आश्‍वासन दिले होते, त्या घोषणेने मी प्रभावित झालो होतो. काँग्रेसची ‘न्याय’ योजना ही गरिबीवरचा सर्जिकल स्ट्राईक आहे.

55 वर्षांत ‘न्याय’ का नाही? : वसुंधरा राजे 

55 वर्षे सत्ता भोगताना गरिबांची तेव्हा काळजी का वाटली नाही? आता काँग्रेस ‘न्याय’ देण्याची भाषा करत आहे, अशी टीका भाजप नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी केली. जयपूर येथे सोमवारी केंद्रीय मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, 55 वर्षे काँग्रेस काय करत होती? काँग्रेसचा ‘गरिबी हटाव’ हा नारा अजूनही सुरू आहे. 55 वर्षांत ते गरिबी घालवू शकले नाहीत.