होमपेज › National › ममता सरकारने घोटला लोकशाहीचा गळा; अमित शहांचा घणाघात 

ममता सरकारने घोटला लोकशाहीचा गळा; अमित शहांचा घणाघात 

Published On: Dec 07 2018 3:01PM | Last Updated: Dec 07 2018 3:01PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाच्या प्रस्तावित रथयात्रेला परवानगी नाकारली आहे. या मुद्यावरून आता भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. याच मुद्यावरून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर लोकशाहीचा गळा घोटला असल्याचा आरोप केला आहे. भाजपच्या तिन्ही रथयात्रा थांबविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ममता यांच्या सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग होत असून सामान्य लोकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंचायत निवडणुकीनंतर ममतांना भाजपची धास्ती वाटत आहे, असे आरोप शहा यांनी केले आहेत.

भाजपने शुक्रवार ७ डिसेंबरपासून कुचबिहार येथून रथयात्रा सुरू करण्याचे आयोजन केले होते. या रथयात्रेसाठी पश्चिम बंगालमधील सरकारकडे आठवेळा परवानगी मागितली होती. मात्र, राज्य सरकारने यासाठी परवानगी नाकारली. कोलकाता उच्च न्यायालयानेही भाजपच्या रथयात्रेला परवानगी नाकारली आहे. 

या पार्श्वभूमीवर बोलताना शहा यांनी आरोप केला आहे की जेवढा हिंसाचार ममतांच्या काळात झाला तेवढा कम्युनिस्ट सरकारच्या कार्यकाळात झाला नव्हता. आम्ही पंचायत निवडणुकीत ७ हजारांहून अधिक जागा जिंकत दुसरे स्थान मिळवले. यामुळेच ममता भाजपला घाबरत आहेत.