Sun, Aug 25, 2019 02:35होमपेज › National › मोदी, रघुराम राजन, चंद्राबाबू, मायावती की पवार ?

मोदी, रघुराम राजन, चंद्राबाबू, मायावती की पवार ?

Published On: May 16 2019 2:02AM | Last Updated: May 15 2019 8:05PM
राजा आदाटे

लोकसभेच्या रणसंग्रामाच्या निकालाची तारीख जवळ आल्याने केवळ देशातच नव्हे तर जगभरातील राजकीय तज्ज्ञांनी आपले अंदाज बांधण्यास सुरुवात केली असून जर भारतीय जनता पक्षाला बहुमत गाठता आले नाही तर नरेंद्र मोदींची जागा कोण घेणार याबाबत काही नावे चर्चेत आली आहेत. त्यात रघुराम राजन, चंद्राबाबू नायडू, मायावती की शरद पवार, असा क्रम चर्चेला आला आहे. त्यात बहुमत जुळवण्याची धमक असलेले नेतृत्व, भारताची प्राप्त परिस्थिती हाताळण्याची क्षमता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे संबंध सुधारणार्‍या व्यक्‍तींना प्राधान्य दिले जाईल, अशी चर्चा आहे. म्हणून ही नावे चर्चेत आणली जात आहेत. या पार्श्‍वभूमीवरच विरोधी पक्षाचे नेते कामाला लागले असून याबाबत चाचपणी करण्यासाठी मतमोजणीपूर्वी दिल्लीत एक बैठकही आयोजित करण्यात येणार आहे.

चंद्राबाबू नायडू यांच्या वतीने 23 मे रोजी होणार्‍या मतमोजणीपूर्वी विरोधी पक्षांची एक बैठक आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला गेला आहे. मात्र उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडी करून निवडणूक लढवत असलेल्या मायावती आणि अखिलेश यादव यांनी या बैठकीस अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या बैठकीस उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली होती. सर्व नेत्यांची उपस्थिती निश्‍चित झाल्यानंतर ही बैठक 21 मे रोजी होण्याची शक्यता आहे. चंद्राबाबू नायडू यांनी यासंदर्भात पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच त्यांनी राहुल गांधी यांच्याशीसुद्धा यासंदर्भात चर्चा केली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी अशा कुठल्याही बैठकीत सहभागी होण्यास ममता बॅनर्जी यांनी नकार दिला आहे. 

निवडणुकीचा सहावा टप्पा 12 मे रोजी पार पडला असून अखेरचा मतदानाचा सातवा टप्पा 19 मे रोजी आहे. मतमोजणीला बरोबर आठ दिवस बाकी राहिले आहेत. याच वेळी रघुराम राजन यांचे नाव चर्चेत अचानक वाढले आहे. रघुराम राजन हे अर्थशास्त्रज्ञ आहेत. 4 सप्टेंबर 2013 रोजी त्यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे 23 वे गव्हर्नर म्हणून नियुक्‍ती झाली होती. मात्र पंतप्रधान मोदी यांच्या आर्थिक धोरणांवर टीका करत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजन भारतीय अर्थ मंत्रालयाचे प्रमुख आर्थिक सल्लागार होते. तसेच 2003 ते 2007 ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख अर्थतज्ज्ञ होते. रघुराम राजन यांची बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नर पदासाठी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजन यांचा जन्म 1963 साली भोपाळ, मध्य प्रदेश येथे तमिळ कुटुंबात झाला. त्यांचे वडील भारतीय गुप्तवार्ता केंद्रात वरिष्ठ अधिकारी होते. त्यांनी 1985 साली भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, दिल्ली (आयआयटी) मधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. अडचणीच्या काळात सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंग यांचे नाव पुढे केले होते. त्याचीच पुनरावृत्ती आताही होण्याची शक्यता काही तज्ज्ञांना वाटत आहे.

भारतीय आणि भारतातील गुंतवणूक करणारे परदेशी उद्योजक यांची एक लॉबी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे. मोदींना सिंहासनावर बसवताना यातील काही प्रमुखांनी पुढाकार घेतला होता. मात्र रिलायन्स ग्रुपचा अंबानी परिवार, अदानी आणि काही मोजक्या उद्योजकांचा गेल्या पाच वर्षांत प्राधान्याने फायदा झाला आहे. त्यामुळे एक मोठा गट दुखावला गेला आहे. शिवाय जीएसटीच्या फटक्यामुळे व्यापारी वर्गात प्रचंड असंतोष आहे. रेरा आणि नोटबंदीमुळे बिल्डरलॉबी प्रचंड अडचणीत आली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची नाडी व्यापार, उद्योग आणि शेतीशी संबंधित आहे. याचा समन्वय साधून राजकीय पक्षांना हाताळणारे नेतृत्व या लॉबीला हवे आहे. म्हणून ही नावे चर्चेत आणली गेली आहेत. या निकालात मायावतींच्या बहुजन समाज पार्टीला बर्‍यापैकी यशाची अपेक्षा असून अखिलेशचा त्यांना सध्या तरी जाहीर पाठिंबा आहे. परंतु इतर निकषात मायावती यांचा क्रमांक खाली जातो. म्हणून बाकी नावांची चर्चा सुरू झाली आहे.

असे नेतृत्व राहुल गांधींना नको : काँग्रेस पक्षातील सूर

निकालाची परिस्थिती त्रिशंकू पद्धतीची झाली तर अशा अस्थिर डोलार्‍याचे नेतृत्व राहूल गांधींनी स्वीकारू नये, असे काँग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळात चर्चिले जात आहे. म्हणून तज्ज्ञ व्यक्‍तीचे नाव शोधावे आणि रिमोट कंट्रोलची भूमिका त्यांनी बजावावी, अशी सर्वसाधारण चर्चा आहे. मात्र यात अखिलेश आणि मायावतींचा पाठिंबा मिळवणे जिकिरीचे असून किंग मेकर्सच्या भूमिकेत ते राहतील. त्यामुळे चंद्राबाबू आणि पवारांचे नाव चर्चेत आहे.

काँग्रेसला वगळून आघाडी बनवणे व्यर्थ : स्टॅलिन

एकीकडे चंद्राबाबू नायडू हे काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत; तर दुसरीकडे टीआरएसचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी निकालांनंतर केंद्रात बिगर काँग्रेस, बिगर भाजप आघाडी बनवण्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन तसेच डीएमकेचे नेते स्टॅलिन यांच्याशी चर्चा सुरू केली आहे. चंद्रशेखर राव यांनी एम. के. स्टॅलिन यांच्यासोबत सोमवारी चर्चा केली होती. त्यावेळी केंद्रात पुढील सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी स्टॅलिन यांची मदत मागितली. मात्र काँग्रेसला वगळून अशी आघाडी बनवणे व्यर्थ असल्याचे स्टॅलिन यांनी चंद्रशेखर राव यांना सांगितल्याचे वृत्त आहे. 

मी शर्यतीत नाही : चंद्राबाबू

मी केवळ समन्वयक असल्याचे चंद्राबाबू नायडू यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. निवडणुकीच्या निकालाबाबत त्यांनी त्यांचे भाकीत व्यक्‍त केले. मोदी सरकारबद्दल जनतेमध्ये नाराजी असल्याने त्याचा भाजपविरोधकांना फायदा होऊन त्यांना सत्ता मिळेल. भाजपच्या विरोधातील सर्वच पक्ष शक्‍तिमान असून, त्यांचे नेतेही सामर्थ्यशाली आहेत. ते मोदींहून अधिक चांगले आहेत. त्यामुळे विरोधकांपैकी पंतप्रधानपदासाठी कोण सर्वोत्तम आहे, याचा निर्णय निकालानंतर सार्वमताने केला जाईल, असे नायडू म्हणाले.