Thu, Mar 21, 2019 01:43होमपेज › National › भाजपला तिहेरी धक्‍का

भाजपला तिहेरी धक्‍का

Published On: Mar 14 2018 11:02AM | Last Updated: Mar 14 2018 6:44PMलखनौ/ पटणा : वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशातील दोन आणि बिहारमधील एका लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा  तिहेरी धक्‍का बसला असून, 29 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्‍ला असलेली  गोरखपूर येथील जागा भाजपने गमावली आहे. त्याशिवाय फूलपूर आणि बिहारमधील अरारिया येथेही भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर भाजपला ही पोटनिवडणूक सोपी जाईल, असे वाटत होते. मात्र, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष यांच्यातील युतीने उत्तर प्रदेशात नवीन राजकीय समीकरणे तयार झाल्याने भाजपला पराभव सहन करावा लागला. बिहारमध्ये नितीशकुमार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीतही भाजपचा पराभव झाला.

गेल्या 29 वर्षांपासून भाजपचा गड असलेल्या आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सलग पाचवेळा विजय मिळवलेल्या गोरखपूरमध्ये समाजवादी पक्षाच्या प्रवीण निषाद यांनी भाजपच्या उपेंद्र दत्त शुक्‍ला यांचा 21 हजार 961 मतांनी पराभव केला. 1989 पासून ही जागा भाजपकडेच होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी विजय मिळवलेली फूलपूरची जागाही सपने आपल्याकडे खेचली आहे. या ठिकाणी नागेंद्रप्रसाद सिंग पटेल यांनी कौशलेंद्रसिंग पटेल यांचा 59 हजार 460 मतांनी पराभव केला. 

लालूप्रसाद यादव यांच्या राजदने अरारिया मतदार संघात विजय मिळवला. सरफराज आलम यांनी भाजपच्या प्रदीपकुमारसिंग यांचा 60 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. जेडीयू-भाजप आघाडीसाठी हा मोठा धक्‍का मानला जात आहे. भाजपला थोडफार दिलासा म्हणजे भभुवा या छोट्या मतदार संघात रिकी राणी पांडे यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून जागा आपल्याकडे राखली.

नव्या समीकरणांची नांदी 

गोरखपूरमध्ये अखिलेश यादव यांच्या सपच्या उमेदवाराला पाठिंबा देताना मायावती यांच्या बसपाने आपला उमेदवार उभा केला नव्हता. त्यामुळे ओबीसी-दलित आणि मुस्लिम मताची विभागणी टळली आणि त्याचा फटका भाजपला बसला. विशेषत: गोरखपूरमधील सप-बसपा युती नव्या राजकीय समीकरणांची नांदी समजली जात आहे. समाजवादी पक्षाला बसपाची साथ लाभली होती. भाजपचा पराभव करण्यासाठी अनेक वर्षांची राजकीय कटुता विसरून सप-बसपा एकत्र आले होते. 

“अतिआत्मविश्‍वास आम्हाला भोवला. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष यांच्यातील युतीचा परिणाम ओळखण्यास आम्हाला अपयश आले. या पराभवानंतर सखोल विश्‍लेषण केले जाईल.”
- योगी आदित्यनाथ, उ. प्रदेश मुख्यमंत्री 

“मायावती यांनी आमच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मतदार संघातच जनता नाराज असेल, तर लोकसभेच्या निवडणुकीत काय चित्र असेल, याची कल्पना करा.”
- अखिलेश यादव, माजी मुख्यमंत्री