Wed, Jul 08, 2020 04:10होमपेज › National › धर्मनिरपेक्षतेमुळेच भारतात मुस्लिम ४ कोटींचे २० कोटी झाले!

धर्मनिरपेक्षतेमुळेच भारतात मुस्लिम ४ कोटींचे २० कोटी झाले!

Last Updated: Feb 26 2020 1:55AM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

सीएए (सिटिझन अ‍ॅमेंडमेंट अ‍ॅक्ट) हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. भारतीय मुस्लिमांच्या विषयावर मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मजबूत उत्तर दिले आहे. भारतात संख्येने 4 कोटी असलेले मुसलमान आज 20 कोटींवर गेलेले आहेत, हे ते उत्तर! धर्मनिरपेक्षतेशिवाय हे घडलेले नाही. मोदी हे इथल्या मुस्लिमांच्याही हितासाठी काम करत आहेत. सीएएच्या विषयावर मला अधिक बोलायचे नाही. हा विषय मी भारतावरच सोडतो. आपल्या लोकांच्या हिताचा निर्णय भारत घेईल, हे आपण गृहित धरू या, असे मत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

53 मिनिटांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी 19 प्रश्नांची उत्तरे दिली. ट्रम्प म्हणाले, काश्मीरवर मध्यस्थी करण्यासंदर्भात मी काहीही बोललेलो नाही. काश्मीर हा निश्चितच भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा मोठा विषय आहे. आणि तो सर्वस्वी द्विपक्षीय म्हणजे भारत आणि पाक यांच्यातलाच आहे. पाकिस्तानातून  भारतात होणार्‍या दहशतवादी कारवायांबाबत मोदींशी चर्चा केल्याचे सांगून ट्रम्प म्हणाले, इम्रान खान माझे चांगले मित्र आहेत. त्यांनीही मला सांगितलेले आहे की, ते त्यांच्या परीने  दहशतवादी कारवायांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

धार्मिक स्वातंत्र्य या विषयावरही मी मोदींशी चर्चा केली. मोदींचे म्हणणे आहे की, लोकांना धार्मिक स्वातंत्र्य असलेच पाहिजे. भारत त्यासाठी सातत्याने गंभीर प्रयत्न करत आहे, हे तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघू शकता, असे ठामपणे सांगून दिल्लीत सीएएवरून सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल ट्रम्प म्हणाले, मी मोदींशी या विषयावर काहीही बोललो नाही. कारण हा पूर्णपणे स्थानिक विषय आहे. भारताकडून अमेरिकन उत्पादनांवर लावण्यात येणार्‍या करांबाबत ट्रम्प म्हणाले, “बहुदा भारत हा सर्वाधिक कर लादणारा देश आहे. हार्ले डेव्हिडसनला म्हणूनच फार जास्त कर द्यावा लागतो. अमेरिकेसोबत समतेचा व्यवहार अपेक्षित आहे.

दहशतवादाविरुद्ध संयुक्तपणे लढण्याचा ट्रम्प यांचा निर्धार

भारत आणि अमेरिकेदरम्यान मंगळवारी संरक्षण क्षेत्रातील महत्वपूर्ण करार करण्यात आले. त्यानुसार भारत अमेरिकेकडून 3 अब्ज डॉलर्सची  (21 हजार 528 कोटी रुपये) संरक्षणसामग्री खरेदी करणार असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. 

दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी दोन्ही देश संयुक्तपणे काम करणार असल्याचेही ट्रम्प यांनी यावेळी सांगितले. संरक्षण करारासोबतच नैसर्गिक वायू, अणुऊर्जा सहकार्य, आरोग्य आदी क्षेत्रांतील पाच करार करण्यात आले. ट्रम्प यांच्या भारत दौर्‍यातील हे मोठे यश मानले जाते.