Sat, Dec 15, 2018 15:26होमपेज › National › तिहेरी तलाक : कोण आहे भाजपमध्ये प्रवेश करणारी २४ वर्षीय निदा खान?

तिहेरी तलाक : कोण आहे भाजपमध्ये प्रवेश करणारी २४ वर्षीय निदा खान?

Published On: Aug 10 2018 2:20PM | Last Updated: Aug 10 2018 2:20PMबरेली (उत्तर प्रदेश) : पुढारी ऑनलाईन

इस्‍लाममधील तिहेरी तलाक प्रथेला आव्‍हान देणारी सामाजिक कार्यकर्ती निदा खानने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याबाबत खान हिने गुरुवारी माहिती दिली. तलाक पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी, निकाह हलाल आणि बहुपत्‍नीत्‍व या प्रथांविरोधात लढ्यासाठी आपण भाजपमध्ये दाखल होत असल्याचे २४ वर्षीय निदाने सांगितले. 

तिहेरी तलाकविरोधातील लढ्यामुळे आला हजरत दर्ग्याने तिच्याविरोधात समाजातून बहिष्‍कृत करण्याचा फतवा काढला होता. त्यानंतर निदा राष्‍ट्रीय माध्यमांमध्ये चर्चेत आली होती. निदा ही स्‍वत: तिहेरी तलाक पीडिता असून तलाक पीडित आणि निकाह हलालमुळे त्रस्‍त महिलांसाठी एक स्‍वयंसेवी संस्‍था (एनजीओ) चालवते. 

"मी तिहेरी तलाक, निकाह हलाल आणि बहुपत्‍नीत्‍व प्रथांविरोधात जिल्‍हा स्‍तरावर लढा देत आहे. प्रत्येक दुसरे कुटूंब हे यांमुळे पीडित आहे. मी भाजपमध्ये दाखल झाल्यानतंर या प्रथांमुळे पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्‍ट्रीय पातळीवर काम करू शकेन. आता पक्षच ठरवेल की मी केव्‍हा आणि कुठे काम करायचे आहे," असे निदा खान एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्‍हणाली.

दरम्यान, २४ वर्षीय निदा खान हिला शरीन रझा यांनी २०१६ मध्ये तिहेरी तलाक दिला होता. शरीन रझा हा आला हजरत दर्गाहच्या प्रमुखांच्या कुटुंबातील सदस्य आहे. तलाकनंतर रझा हिने न्यायालयात धाव घेतली, तसेच न्यायालयाने हा तलाक बेकायदा ठरवला होता. २०१५ मध्ये गरोदर असताना नवर्‍याने मारहाण केल्याने गर्भपाताला सामोरे जावे लागल्याचा आरोपही निदा खानने केला आहे.