Wed, Apr 01, 2020 23:23होमपेज › National › दहशतवाद नष्ट करा; ट्रम्प यांचा पाकला इशारा

दहशतवाद नष्ट करा; ट्रम्प यांचा पाकला इशारा

Last Updated: Feb 25 2020 12:42AM
अहमदाबाद : वृत्तसंस्था

दोन दिवसांच्या भारत भेटीवर सहकुटुंब आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सोमवारी (दि. 24) जगातील सर्वात भव्य असा मोतेरो स्टेडियमवर नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमात जंगी आणि जल्लोषी स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त भारतीयांच्या वतीने त्यांचे स्वागत केले. भारतीयांच्या या स्वागताने आपण भारावून गेलोे, अशा शब्दांत ट्रम्प यांनी आपले हृदगत व्यक्त केले. भारताला दहशतवादाची अमेरिकाइतकीच मोठी झळ सोसावी लागली आहे. त्यामुळे अमेरिका भारताला जगातील सर्वोत्तम आणि संहारक क्षेपणास्त्रे आणि शस्त्रास्त्रे देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.  पाकिस्तानने आपल्या भूमीवरून होणार्‍या दहशतवादी कारवायांना तातडीने पायबंद घालावा, तेच त्यांच्या हिताचे ठरेल, असा इशाराही त्यांनी भारत भूमीवरून दिला. ट्रम्प यांनी आपल्या भाषणात भारताच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख केला. दिवाळी आणि होळीसारख्या सणांपासून सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली  यांच्या योगदानापर्यंत अनेक मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला.

ट्रम्प यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानवर निशाणा साधत त्यांना दहशतवादाच्या मुद्द्यावर कठोर  शब्दांत इशारा दिला. दहशतवादाची मोठी किंमत भारताला चुकवावी लागली आहे. अमेरिकेलाही त्याची मोठी झळ बसली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका ही दोन बलाढ्य राष्ट्रे दहशतवादाचा निःपात करण्यासाठी एकजूट झाली आहेत, असे ट्रम्प यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांना साथ दिली. पाकिस्तानच्या सीमेवरून दहशतवाद्यांच्या हालचाली मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. आम्ही सत्तेवर येताच हा दहशतवाद संपविण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. पाकिस्तानलाही तसे करण्यास बजावले आहे. त्यांना हे करावेच लागेल, असे ट्रम्प यांनी निक्षून सांगितले. अमेरिका लवकरच भारताला संहारक अशी क्षेपणास्त्रे आणि शस्त्रास्त्रे देणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली. 

आपल्या देशाची सीमा सुरक्षित ठेवण्याचा अधिकार प्रत्येक देशालाच आहे, असे सांगून ते म्हणाले, आम्ही इसिसचा पूर्णपणे  निःपात केला आहे. आणि त्यांचा म्होरक्या अल बगदादीला ठार मारले आहे.       पान 7 वर 
दहशतवादाचा बीमोड करण्याच्या दिशेने आम्ही उचललेले हे निर्णायक पाऊल आहे.
पाच वर्षांपूर्वी आम्ही टेक्सास येथे फुटबॉलच्या विशाल स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जंगी स्वागत केले होते. आज त्यांनी जगातील सर्वात भव्य स्टेडियममध्ये आमचा सत्कार केल्याने आम्ही भारावून गेलो आहोत. आमच्या आयुष्यातील हा अत्यंत अविस्मरणीय क्षण आहे, असे सांगताना ट्रम्प भावूक झाले.

चायवाले मोदी

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. भारताला जगात अव्वल स्थानी नेण्यासाठी अहोरात्र झटणारा नेता, असा उल्लेख त्यांनी केला. मोदी यांच्या पूर्वायुष्यावरही त्यांनी भाष्य केले. एकेकाळी चहा विकणारी ही व्यक्ती आज जागतिक स्तरावर आदराने ओळखली जाऊ लागली आहे, असे ट्रम्प म्हणाले. इतकेच नाही तर त्यांनी मध्येच आपले भाषण थांंबविले. ते मोदी यांच्याकडे वळले. त्यांच्याशी हस्तांदोलन केले. त्यानंतर आपल्या भाषणाला पुढे सुरुवात केली. त्यांच्या या कृतीमुळे टाळ्यांच्या कडकडाटाने मोतेरा स्टेडियम दणाणून गेले. भारताचे हे प्रेमळ आदरातिथ्य आम्ही कधीच विसरू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूपच प्रेमळ आहेत. भारतीयांनी त्यांच्या या प्रेमळ स्वभावाचा अनुभव घेतला आहे पण तुम्हाला एक गोष्ट अभिमानाने सांगू इच्छितो ती म्हणजे ते जितके प्रेमळ आहेत तितकेच कर्तव्य कठोरही आहेत त्यामुळे त्यांनी भारताला इतक्या उंचीवर नेऊन ठेवले आहे असे त्यानी कौतुकभरल्या स्वरात सांगितले. मोदी यांनी भारताच्या हिताशिवाय दुसरा कसला विचारच केला नाही, असे ट्रम्प म्हणाले.

एकता हेच भारताचे सामर्थ्य

भारत हा जगातील अव्वल देशांपैकी एक आहे. आज सर्वच क्षेत्रांत देशाने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या सर्वांवर नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे संपूर्ण जगाला आदर्श ठरणारी भारताची एकता. ही एकता हेच भारताचे सामर्थ्य आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीचा आदराने उल्लेख केला.

ट्रम्प म्हणाले, मी आणि मिलेनिया 8000 किलोमीटरचा प्रवास करून आपल्याला भेटण्यास, आपल्याशी सुसंवाद साधण्यास आलो आहे. अमेरिका भारतावर प्रेम करतो, अमेरिकेला भारताबद्दल अत्यंत आदर आहे. येणार्‍या काळातही अमेरिका हा भारताचा अत्यंत विश्वासू आणि  निष्ठावान मित्र राहील, अशी ग्वाही ट्रम्प यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच दिली.  

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचे मोदी हे सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत देशातील जनतेने त्यांना पुन्हा एकदा बहुमताने निवडून देऊन यांची साक्षच दिली आहे. यानंतर ट्रम्प हे मोदी यांच्याकडे वळून म्हणाले, मि. मोदी, तुम्ही केवळ गुजरातचा अभिमान नाही. सव्वाशे कोटी भारतीयांच्या हृदयात  आपण स्थान मिळविले आहे. भारत आज जे मनात आणेल  ते करून दाखवू शकतो. अगदी कोणतीही  गोष्ट तो साध्य करू शकतो आणि हे केवळ आपले अपार कष्ट, रात्रंदिवस प्रचंड मेहनत याच्या जोरावरच शक्य होत आहे. आम्हा प्रत्येक अमेरिकन नागरिकांना तुमचा आणि तुमच्या देशाचा अत्यंत अभिमान वाटतो.

आकडेवारीत मांडला भारताच्या प्रगतीचा अहवाल

ट्रम्प यांनी आपल्या भाषणात भारताने गेल्या सत्तर वर्षांत जी उंची गाठली, त्याचा तपशील अगदी आकडेवारीसह मांडला. भारतातील 32 कोटी लोक आज इंटरनेटचा वापर करीत आहेत, गेल्या काही वर्षांत महामार्गांचे दुपटीने विस्तारीकरण झाले आहे. 60 कोटी लोकांना मूलभूत नागरी सुविधांचा लाभ मिळत आहे. भारतात रोज एका मिनिटाला बारा नागरिक दारिद्य्ररेषेतून वर येत आहेत, असे त्यांनी सांगितले. भारत लवकरच मध्यमवर्गीयांचा जगातील सर्वात मोंठा देश म्हणून नावारूपाला येईल, दारिद्य्ररेषा भारतात उरणारच नाही, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला. भारताने हे सर्व साध्य करताना लोकशाहीप्रधान देश, शांतीप्रिय अहिंसक देश या आपल्या प्रतिमेला कोठेही तडा जाऊ दिलेला नाही हे विशेष होय.

अमेरिका असेल की भारत, दोन्ही देशांची परमेश्वरावर अपार श्रद्धा आहे. प्रत्येक नागरिकाला सन्मानाने आणि आदराने वागविण्याची परंपरा आहे. प्रामाणिकपणाने कष्ट करण्याची दोन्ही देशांत परंपरा आहे. त्यामुळेच आपल्यातील मैत्री ही नैसर्गिक आणि विश्वासार्ह असल्याचे ट्रम्प म्हणाले. त्यांनी आपल्या भाषणात स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा संदर्भही दिला.

ट्रम्प यांनी आपल्या भाषणात मोदींच्या नेतृत्वाचा, जगात उंचावलेल्या भारताच्या प्रतिमेचा  उल्लेख करतानाच बॉलीवूडपासून ते अगदी भारतातील सणांचाही उल्लेख केला. ट्रम्प यांनी सचिन तेंडुलकरसह भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांचा आदरपूर्वक उल्लेख केला. जागतिक नकाशावर भारताला जे अग्रस्थान मिळाले, त्यात या दोघांचा मोलाचा वाटा असल्याचे ते म्हणाले. या दोघांचा उल्लेख होताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या उल्लेखाने आनंदित झाले.

बॉलीवूड नावाने ओळखल्या जाणार्‍या भारतीय सिनेसृष्टीत वर्षाला दोन हजार चित्रपटांची निर्मिती होते. जगातील कोणत्याही देशाला ही किमया साध्य करता आलेली नाही, असे ट्रम्प यांनी सांगितले. त्यानी विशेष करून ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, आणि ‘शोले’ या दोन चित्रपटांचा उल्लेख केला. या चित्रपटांनी लोकप्रियतेचा कळस गाठल्याचे त्यांनी सांगितले.

ट्रम्प यांनी मोतेरा स्टेडियमवर केलेल्या भाषणात भारताबरोबरचे संरक्षण संबंध अधिक बळकट करणार असल्याची घोषणाही केली. मंगळवारी भारताबरोबर 3 अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार करणार असल्याचे ते म्हणाले. अमेरिका भारताचा प्रमुख संरक्षण भागीदार होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

भारताबरोबर 3 अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार करणार

भारतीय सुरक्षा दलांना हेलिकॉप्टर आणि अन्य लष्करी साहित्य पुरवण्यासाठी अमेरिकेचे  प्रतिनिधी भारताबरोबर 3 अब्ज डॉलर्सच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी करतील, हे जाहीर करताना मला आनंद होत आहे, असे ट्रम्प म्हणाले. शत्रूच्या मनात धडकी भरवणारी पृथ्वीवरील घातक  शस्त्रास्त्रे आम्ही भारताला देऊ. आम्ही उत्तम शस्त्रांची निर्मिती करतोय आणि भारताबरोबर आमचा व्यापार सुरू आहे, असे ट्रम्प म्हणाले.

एमएच 60 रोमिओ सी हॉक हेलिकॉप्टरचा करार

भारतीय नौदलासाठी 24 बहुपयोगी ‘एमएच 60 रोमिओ सी हॉक’ हेलिकॉप्टरची खरेदी करण्याचा करार करू शकतो, असा संकेत ट्रम्प यांनी आपल्या भाषणात दिला.  भारताला गेल्या  एक दशकाहून अधिक काळापासून इन हंटर हेलिकॉप्टरची गरज होती. लॉकहिड मार्टिनद्वारे निर्मित हेलिकॉप्टर पाणबुडी आणि जहाजांवर अचूक निशाणा साधण्यास सक्षम आहेत. हे हेलिकॉप्टर जगातील सर्वांत अत्याधुनिक असे समुद्री हेलिकॉप्टर मानले जाते.  यामुळे भारतीय नौदलाची मारक क्षमता वाढणार आहे.

सकाळी आठपासूनच स्टेडियममध्ये तुफान गर्दी

संपूर्ण जगाचे डोळे लागलेल्या ‘नमस्ते ट्रम्प’ या महासोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी एक लाखांहून अधिक लोकांनी मोतेरा स्टेडियमवर तुफान गर्दी केली होती. ट्रम्प यांच्या भाषणाला दुपारी दीड वाजता सुरुवात होणार होती. मात्र लोकांनी सकाळी आठपासूनच स्टेडियमवर हजेरी लावण्यास सुरुवात केली. मुख्य सोहळ्याच्या ठिकाणापासून पार्किंग साधारण दोन किलोमीटर अंतरावर होते. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने चालत स्टेडियममध्ये येत होते. वयोवृद्ध आणि महिलांना मात्र बसमधून स्टेडियमपर्यंत पोहोचविण्यात आले. अनेक लोकांनी ट्रम्प आणि मोदी यांची छायाचित्रे असलेले मुखवटे चेहर्‍यावर लावले होते. 

कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी बॉलीवूडचे प्रख्यात गायक कैलाश खेर आणि स्थानिक गायकांनी तब्बल दोन तास लोकांचे मनोरंजन केले.  या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेल्या मान्यवरांमध्ये नामवंत अनिवासी भारतीय तसेच उद्योगपतींचा समावेश होता.

भारताबद्दल ट्रम्प यांचे उद्गार

 भारताने आपले यश एक लोकशाहीवादी देश म्हणून आणि एक सहिष्णू राष्ट्र म्हणून कमवले. भारताच्या या कामगिरीशी कुणाचीही तुलना होऊ शकत नाही.
 लाखो हिंदू, मुस्लिम, शीख, जैन आणि ख्रिश्चन सोबत प्रार्थना करतात. अशा भारताबद्दल जगाला नेहमीच आदर वाटत आला आहे. भारत एक मजबूत आणि थोर राष्ट्र म्हणून जगासमोर उभे राहिले आहे.
 भारतासोबतचे संबंध आणखी द़ृढ करण्यासाठी मी आलो आहे. उद्या (मंगळवारी) तीन अब्ज डॉलर्सच्या संरक्षण खरेदी व्यवहारावर आम्ही स्वाक्षर्‍या करणार आहोत. संरक्षण क्षेत्रात भारताने आमचा भागीदार व्हावे, असे आम्हाला वाटते.
 भारत-अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला ताकद देणारा व्यापार करार आम्ही करणार आहोत. परंतु पंतप्रधान मोदी हे वाटाघाटीसाठी अत्यंत कठीण आहेत. (मोदी इज ए टफ निगोशिएटर).