Sun, Dec 15, 2019 06:01होमपेज › National › देशात मागील पाच वर्षात 'सुपर इमर्जन्सी'; ममतांचा पीएम मोदींवर निशाणा

देशात मागील पाच वर्षात 'सुपर इमर्जन्सी' : ममता

Published On: Jun 25 2019 1:27PM | Last Updated: Jun 25 2019 2:42PM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

ममता बॅनर्जी यांची नरेंद्र मोदी सरकारविषयी आतापर्यंत घेतलेली भूमिका सर्वांना परिचीत आहे. लोकसभा निवडणुकीच्‍या काळात ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्‍यातील वादाचे दर्शन झालेच आहे. आताही ममता बॅनर्जी यांनी आणीबाणीवरुन थेट मोदी सराकारवर निशाणा साधला आहे. देशात मागील पाच वर्षे आणीबाणीपेक्षाही वाईट म्‍हणजे 'सुपर इमर्जन्सी'  होती असे म्हणत ममतांनी पंतप्रधान मोदींवर आणि मोदींच्या कार्यकाळावर हल्‍ला चढवला आहे. मोदी सरकारची पहिली टर्म म्हणजे आणीबाणीपेक्षा वाईट काळ होता, असे ममतांनी म्हटले आहे. 

२५ जून १९७५ या वर्षी  देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. त्याच गोष्टीची आठवण सांगताना ममता बॅनर्जी यांनी देशात आणीबाणीपेक्षा वाईट काळ मागील पाच वर्षे होता असे म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांनी याविषयी ट्विट केले आहे. त्‍यांनी ट्विटमध्‍ये म्‍हटले आहे की, १९७५ या वर्षी आजच्या दिवशी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. देशात मागील पाच वर्षे आणीबाणीपेक्षा वाईट काळ म्‍हणजे 'सुपर इमर्जन्सी'  होती. तसेच आपण आपल्या इतिहासातून धडे घेतले पाहिजेत. ज्यामुळे लोकशाहीच्या हितांचे रक्षण करता येणे शक्य होते. 

काही दिवसांपूर्वीच 'वन नेशन वन इलेक्शन' या विषयावरच्या चर्चेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण दिले होते. मात्र त्या बैठकीलाही ममता बॅनर्जी गेल्या नव्हत्या. यावरुन मममा बॅनर्जी व नरेंद्र मोदी यांच्‍यातील वाद पुन्‍हा समोर आला होता. 

माजी पंतप्रधान इंदिरा गांधीं यांनी २५ जून १९७५ रोजी देशात अंतर्गत आणीबाणी लागू केली. तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी घटनेच्या ३५२(१) कलमानुसार २५ जूनच्या रात्री आणीबाणीच्या मसुद्यावर स्वाक्षरी केली आणि लगेचच आणीबाणी लागू झाली. या निर्णयाची घोषणा २६ जूनला रेडिओवरुन इंदिरा गांधी यांनी केली.