Mon, Aug 19, 2019 15:38होमपेज › National › धनदांडग्यांनी आगीशी खेळ थांबवावा; सुप्रीम कोर्टाने सुनावले 

धनदांडग्यांनी आगीशी खेळ थांबवावा; सुप्रीम कोर्टाने सुनावले 

Published On: Apr 25 2019 12:16PM | Last Updated: Apr 25 2019 12:16PM
 नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्यावर करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोप प्रकरणी आज, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायपालिकेला पद्धतशीरपणे लक्ष्य केल्याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. आता देशातील धनदांडग्यांना सांगण्याची वेळ आली आहे की ते आगीशी खेळ करत आहेत आणि हे आता थांबवावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावले आहे. या प्रकरणी दुपारी २ वाजता आदेश देण्यात येणार आहे. 

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यासाठी त्यांना लैंगिक छळाच्या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोप वकिलानी केला आहे. याबाबत आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या विशेष खंडपीठाने, गेल्या ३-४ वर्षात ज्या पद्धतीने न्यायपालिकेला वागविण्यात आले; ते पाहून दु:ख झाले, असे नमूद केले. तर न्यायमूर्ती आर. एफ. नरीमन आणि दीपक गुप्ता यांनी म्हटले आहे की, न्यायपालिकेच्या बाबतीत असे घडत राहिल्यास तिचे अस्तित्व टिकून राहणार नाही. न्यायपालिकेवर पद्धतशीरपणे केलेला हा हल्ला आहे, अशा शब्दांत खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात कनिष्ठ न्यायालयीन सहाय्यक म्हणून काम केलेल्या एका महिलेने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केल्यामुळे न्यायालयीन वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सरन्यायाधीशांनी आपल्यावरील आरोपांचा ठाम शब्दांत इन्कार केला असून न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात असल्याचे सांगितले.

न्यायमूर्ती गोगोई यांच्यावर आरोप झाल्यानंतर लगेचच सर्वोच्च न्यायालयात एका खंडपीठाची स्थापना करुन आरोपांच्या अनुषंगाने सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायमूर्ती गोगोई यांनी आपली बाजू मांडली. सरन्यायाधिशांनी गत डिसेंबर महिन्याच्या अखेरीस आपले लैंगिक शोषण केले होते, असा गंभीर आरोप न्यायालयात काम केलेल्या महिलेने केल्यानंतर खळबळ उडाली. सरन्यायाधिशांनी आपल्या निवासस्थानी लैंगिक शोषण केले होते, असे महिलेने प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले आहे.