Thu, Jun 27, 2019 17:49होमपेज › National › शिकागो परिषदेत स्‍वामी विवेकानंद काय म्‍हणाले? 

शिकागो परिषदेत स्‍वामी विवेकानंद काय म्‍हणाले? 

Published On: Jan 12 2019 3:29PM | Last Updated: Jan 12 2019 11:40AM

स्‍वामी विवेकानंद जयंतीविशेष 

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

स्वामी विवेकानंद यांचे नाव घेतले की, डोळ्यापुढं येते ते त्यांचे जागतिक सर्वधर्म परिषदेतील भाषण. या भाषणाने विवेकानंद यांच्‍याबरोबरच भारतालाही जगात एक वेगळी ओळख मिळवून दिली होती. स्‍वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ ला झाला. विवेकानंदांचे मूळचे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते. बंगालचे रहिवासी होते. स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे ते एकनिष्ठ शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमाणसात पोहचविण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरु केले. आज जगभर त्यांच्या अनेक शाखा आहेत. स्वामी विवेकानंद यांची १५६ वी जयंती सर्वत्र साजरी होत आहे. त्यानिमित्ताने शिकॅगो येथील त्‍यांचे भाषण...

सर्वधर्म महासभेचे अध्यक्ष कार्डीनल गिरबन्स यांच्या दोन्ही बाजूंना, पूर्वेकडील विविध धर्मांचे प्रतिनिधी बसले होते. त्यांचे निरनिराळ्या रंगांचे पोशाख उज्ज्वलतेत जणू कार्डिनल यांच्‍या पोशाखाशी स्पर्धाच करीत होते. हिंदू, बौद्ध, आणि मुसलमान प्रतिनिधींच्या त्या समुदायात भारतातील स्वामी विवेकानंद आपल्या भगव्या वेशात त्या सर्वांच्यात आकर्षक दिसत होते. डोक्याला बांधलेल्या भगव्या फेटयामुळे त्यांचे ते मुख फारच शोभिवंत दिसत होते. इतर काही प्रतिनिधींची भाषणे समाप्त झाल्यानंतर स्वामी विवेकानंदांना श्रोतेमंडळीसमोर आमंत्रित करून त्यांचा परिचय करून देण्यात आला. मग आपल्या गुरुदेवांना मनाने वंदन करून स्वामी विवेकानंदांनी श्रोत्यांना, 'अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो' असे शब्द उच्चारताच विशाल सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने आणि प्रशंसासुचक उच्च स्वरांनी कित्येक क्षण एकसारखे दुमदुमत होते. सभागृहात स्तब्धता प्रस्थापित झाल्यानंतर,  प्रतिनिधींना देण्यात आलेल्या स्वागत-सन्मानास उत्तरादाखल स्वामीजींनी छोटेसे भाषण केले. त्‍या भाषणातील काही अंश... 

१. माझ्या बंधू आणि भगिनींनो

माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज तुम्ही जे आमचे हृदयापासून आणि अगत्याने स्वागत केलेत त्यास उत्तर देण्यासाठी मी इथे उभा आहे. शब्द सूचत नाहीत, हृदय अवर्णनीय आनंदाने भरून येत आहे. 

२.मी तुम्हाला धन्यवाद देतो

जगातील सर्वात प्राचीन अशा सन्यासी समाजातर्फे मी तुम्हाला धन्यवाद देत आहे आणि अधिक काय बोलू. अवघ्या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व वर्णांच्या आणि संप्रदायांच्या कोटी- कोटी हिंदू स्त्री-पुरुषांच्यावतीने मी तुम्हाला धन्यवाद देतो.

३. सहिष्णुता व सर्वसमावेशकतेचा संदेश देणाऱ्या धर्माचा एक भाग असल्याचा  अभिमान 

जगाला सहिष्णुता व सर्वसमावेशकतेचा संदेश देणाऱ्या धर्माचा एक भाग असल्याचा याचा मला अभिमान आहे. आम्ही केवळ सर्वसमावेशकता आणि सहिष्णुतेवरच विश्वासच ठेवतो असं नाही तर जगातील प्रत्येक धर्माचा सत्य म्हणून स्वीकार करतो. जगाच्या पाठीवरील सर्व देशांतील आणि धर्मांतील पीडित व गांजलेल्या लोकांना आश्रय देणाऱ्या देशाचा नागरिक असल्याचा मला अभिमान आहे.

४.धर्माचा सार्थ अभिमान

 रोमन हल्लेखोरांनी ज्यांच्या धर्मस्थळांची तोडफोड केली, त्या इस्रायलींनीही दक्षिण भारतातच आश्रय घेतला होता. त्या सर्वांच्या स्मृती आम्ही आमच्या हृदयात आजही जपून ठेवल्या आहेत. महान पारशी धर्माच्या लोकांना शरण देणाऱ्या व आजही त्यांचं पालन-पोषण करणाऱ्या धर्माचा मी एक भाग आहे, याचाही मला सार्थ अभिमान आहे. 

५. सर्व मार्ग भगवंतापर्यंतच जातात

बंधूंनो, लहानपणापासून मी ऐकलेल्या आणि मुखोद्गत केलेल्या एका श्लोकाच्या ओळी आपल्याला ऐकवण्याची माझी इच्छा आहे. कोट्यवधी लोक आजही या ओळींचं पारायण करतात. 'ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्या वेगवेगळ्या ठिकाणी उगम पावून अखेरीस समुद्राला जाऊन मिळतात, त्याचप्रमाणे माणूस आपल्या इच्छेनुसार वेगवेगळे मार्ग निवडतो. हे मार्ग सरळ असो की वाकडे-तिकडे, ते शेवटी भगवंतापर्यंतच जातात. 

६. ही पवित्र परिषद भगवद्गगीतेमधील या सिद्धांताचाच पुरावा

जो माझ्यापर्यंत येतो, तो कसाही असो, मी त्याचा स्वीकार करतो. कुणी कुठलाही मार्ग निवडो, अखेरीस माझ्यापर्यंतच येतो'. आजची ही पवित्र परिषद भगवद्गगीतेमधील या सिद्धांताचाच पुरावा आहे. 

७. सांप्रदायिकता, कट्टरता, कर्मठता आणि धर्मांधतेनं बऱ्याच काळापासून पृथ्वीला आपल्या पंजात जखडले आहे

सांप्रदायिकता, कट्टरता, कर्मठता आणि धर्मांधतेनं बऱ्याच काळापासून पृथ्वीला आपल्या पंजात जखडून टाकले आहे. या साऱ्यांनी पृथ्वीला हिंसाचारानं भरून टाकले आहे. अनेकदा ही पृथ्वी रक्ताने लाल केलीय. कितीतरी संस्कृतींचा नाश केला आहे आणि कितीतरी देश गिळून टाकले आहेत. हे राक्षस नसते तर मानवसमाज आज कितीतरी विकसित झाला असता. 

८. ही परिषद माणसा-माणसांमधील सर्व प्रकारच्या दुर्गुणांचा संहार करेल 

आता या राक्षसांचे दिवस भरले आहेत. मला विश्वास आहे ही परिषद सर्व प्रकारची धर्मांधता, सर्व प्रकारच्या वेदना (मग त्या तलवारीनं झालेल्या असोत की लेखणीनं) आणि माणसा-माणसांमधील सर्व प्रकारच्या दुर्गुणांचा संहार करेल.'  

अशा शब्‍दात स्‍वामी विवेकानंद यांनी  भाषण केले होते. स्‍वामी विवेकानंद यांनी केलेले हे भाषण जागतिक पातळीवर विविध अंगाने गौरवण्यात आले आहे. आजही अनेक भारतीय जेव्‍हा शिकोगामध्ये जातात तेव्‍हा ज्या ठिकाणांहूत विवेकनंदांनी भाषण केले होते त्या ठिकाणाला आवर्जून भेट देतात आणि तिथे नतमस्‍तक होतात.