Sat, Mar 28, 2020 20:29होमपेज › National › लाल महालावरील शिवाजी महाराजांचा सर्जिकल स्ट्राईक

लाल महालावरील शिवाजी महाराजांचा सर्जिकल स्ट्राईक

Last Updated: Feb 19 2020 1:10AM
शशिकांत ओक 
(निवृत्त विंग कमांडर)

शिवाजी महाराजांची लाल महालावरील बेडर, धाडसी धाड ही जागतिक सैनिकी इतिहासातील उत्तमोत्तम कमांडो रेडमध्ये अग्रगण्य आहे. या सर्जिकल कमांडो स्ट्राईकचा लष्कराच्या द‍ृष्टीने विचार आहे. अशा मोहिमेत तीन भाग महत्त्वाचे असतात. 1) हव्या त्या ठिकाणी, हवे तितक्या संख्येने, ठरवलेल्या वेळेस पोहोचवायची योजना. 2) विवक्षित जागेची नासधूस, व्यक्‍तींचा खात्मा 3) कामगिरी संपवून सर्व सैनिकांनी सुरक्षित परत येणे.  शाहिस्तेखान मुघल दरबारात अग्रणी होता. तीन वर्षे पुण्यात ठाण मांडून बसलेला दक्षिण विभागाचा सुभेदार परत उत्तरेत जातच नव्हता. त्याच्या तिथे राहण्याने महाराजांच्या वसुलीवर प्रचंड ताण पडत होता. 

बतावणी योजना : लाल महालापर्यंत सध्याच्या लष्करी भाषेत दोन कंपन्यांच्या संख्येचे कमीत कमी 400 कसलेले खंदे धाडसी जवान होते. कोयाजी बांदल, चांदजी जेधे, बाबाजी व चिमणाजी देशपांडे वगैरे आपापल्या कंपनीचे कमांडर म्हणून नेतृत्व करत होते. महाराजांच्या स्वतःच्या सुरक्षा दस्त्यातील, दोन प्लाटूननी (साधारणत: 60 जण) अतिसुरक्षा कडे तोडून लाल महालातील उंच सुरक्षा भिंती पार करायला दोरशिड्या लावून प्रवेश मिळवायला, काही ठिकाणी दरवाजे, भिंती तोडायला घण, पहारी वगैरे तोडफोड साहित्य बरोबर आणले होते. तिसर्‍या प्लाटूनने ढोल-ताशे, तुतार्‍या आदी घोषवाद्यांनी गलका करून झोपलेल्या सैन्याला गोंधळात टाकायचे होते. या दोन्ही प्लाटूननी आपापली दिलेली कामे पूर्ण केली, की मुठा नदी पार करून पलीकडे भांबुर्ड्यात लपूनछपून आलेल्या दुसर्‍या कंपनीतील प्लाटूननी वरातीसाठी बरोबर आणलेल्या घोड्यावर महाराज स्वार होऊन गणेश खिंडीतून चतुश्रुंगीचा डोंगर पार करून (सध्याच्या पाषाण, सूसकडील भागात) पसार व्हायचे. मोका पाहून परतायचे. तिसरी कंपनी मुठा नदीपलीकडे काठाकाठाने जमून वेळ आली, तर नदी पार करून तिथे अडकलेल्या आपल्या सैनिकांना सोडवायला सज्ज होती. गरज पडली तर महाराजांना जादा घोड्यांची सोय करून द्यायची. मग हळूहळू सिंहगडाच्या पायथ्याशी जमायचे. काहींनी रात्री घडलेल्या घटनेची बातमी काढायची. 

गेटपास : एका लग्‍नाचे गावकरी ताशा, वाजंत्री घेतलेले वर्‍हाडी म्हणून सोंग घेऊन, बाह्यसुरक्षा रक्षकांशी भेटून मुघलांच्या डेर्‍यातून पलीकडे म्हणजे सध्याच्या काळात कात्रजच्या नवर्‍या मुलाचे वर्‍हाड खडकीच्या नवर्‍या मुलीकडच्या लग्‍नाला जायला बैलगाड्यांतून अन्य जनावरांसह परवाने घेऊन आत शिरले. मुघलांच्या हजारोंच्या संख्येने तंबू, राहुट्या, जनावरांचे तबेले, जागोजागी ज्या-त्या सरदारांच्या सैनिकांसाठीचे भटारखाने वगैरे अस्ताव्यस्ततेतून वाट काढत जाता जाता कोणा सरदारांचे डेरे कुठे आहेत, याचा कानोसा घेतला जात होता. तीन वर्षे राहून राहून त्यांच्यात आलेली सुस्ती, सुरक्षेबद्दल ढिलाई याचा अंदाज घेत वर्‍हाडी पुढे सरकत जात राहिले. कोणी विचारले, तर परवाना दाखवून पुढे जाता जाता अतिसुरक्षा कड्यापर्यंत पोहोचायला कंपनी कमांडरनी आपापले मार्ग बदलले. वळणांच्या आडोशाने ठराविक प्लाटून कमांडर आपापल्या दिशेने सुटले. यातच महाराजही होते. 

सूर्य मावळला : 5 एप्रिल 1663, चैत्र शुद्ध अष्टमी ही तिथी तर रमजान महिन्यातील सहावा चंद्र होता. याशिवाय या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, हा दिवस बादशहाच्या राज्यारोहणाच्या वाढदिवसानिमित्त साजरा केल्या जाणार्‍या दिवसांपैकी एक होता. रोजे करून जेवणावर तुटून पडताना शिपाई दिसत होते. अंधारातून महाराज शस्त्रसज्ज होऊन आपल्याबरोबरच्या मावळ्यांची मोजणी करून अतिसुरक्षा कडे तोडायला सज्ज झाले. त्या काळातील चौक्या, वेशीला चुकवून, अंबिल आणि अन्य नाले, ओढ्यांच्या पात्रात उतरून, तर कधी घरांच्या आडोशाने पुढे सरकत कसब्यात येत राहिले. या भागात पूर्वी जात-येत असलेल्या मावळ्यांनी इतरांना बरोबर घेत लाल महालाची तटाची मागची बाजू पकडली. साधारणतः कुठल्याही इमारतीची, वाड्याची, कचेरीची मागची बाजू ही त्या इमारतीत, हवेलीत काम करणार्‍या नोकर-चाकरांच्या वहिवाटीची असते. त्यामुळे त्या बाजूकडे सुरक्षाकडे नेहमीच गलथान असते. 
नव्याने बांधलेल्या भटारखान्यातून पुढे गेले, की थेट मुख्य हवेलीच्या चौकात जाता येते, असे त्यांच्या लक्षात आले. खालच्या मजल्यावर सरदारांच्या बेगमांच्या आया, खोजे झोपले होते. वरच्या मजल्यावर खानाची नाते मंडळी व मुले झोपली होती. रात्री बारानंतर चंद्र डोक्यावरून कलून चौसोप्यात अंधार वाढला. बराच वेळ गेल्यावर भटारखान्यात सकाळची न्याहारी करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी तयारी करायला चुलाणे पेटवायला खानसामे कामाला लागले. 
एकदम वरच्या मजल्यावर बाहेरून चढून जाऊन तिथून हल्ला करायला दोरशिड्यांच्या खुंट्या मारायला हव्या होत्या; पण त्या ठोकाठोकीतून जाग येऊन बेत बारगळायला नको, म्हणून महाराजांनी भटारखान्यातून आणखी मावळ्यांसह जायचे ठरवले. चौकीतून जिने कुठल्या बाजूला आहेत, मुख्य महाल, शेजारच्या झोपायच्या कोठ्या कुठे आहेत, ते खुद्द महाराजांच्या वर्दळीत असल्याने माहिती होते. 

अंगरक्षकांना पुढे घालून महाराज नंगी तलवार तळपत सरसावले. चौकीत येईपर्यंत वाटेत आलेले काही खानसामे मान मुरडून गारद झाले. मधल्या चौकीत आपापल्या पथार्‍या पसरून काही नोकर मुरकटून झोपले होते. त्यांना ओलांडताना काही जागे झाले. गांगरून जाऊन ‘कोण आहे? काय झालं?’ असे विचारतो तोवर ते ठार झाले. महाराज पहिल्या मजल्यावर जिना चढून दोन्ही बाजूला असलेल्या खोल्यांत खान कुठे असेल, याचा अंदाज घेत अंधारात पुढे जात राहिले. महाराजांच्या मते, खान दुसर्‍या मजल्यावर असायला हवा होता. अंगरक्षक महाराजांच्या मागोमाग वर चढून येत असताना जो दिसेल त्याला भोसकून जखमी करत करत सरकत होते. तेवढ्यात खानाचा मुलगा अब्दुल फतेह सावध होऊन ओरडून सांगत सुटला, ‘गनीम आया है! भागो!’   

आवाजाच्या दिशेने एका अंगरक्षकाला जखमी करून त्याने बापाला जागे करून पळून जायला महाराजांना आडवे घेतले. अंधारात मिणमिणत्या अर्धवट दिवट्यांच्या प्रकाशात महाराजांच्या तलवारीचे हात समोरच्याला घायाळ करून जात होते. तिकडे खान काही तरी ‘गदर’ चालू आहे, असे वाटून कमरेला काचा मारून तलवार, खंजीर अंधारात अंदाजाने शोधत होता. मुलगा त्याच्या खोलीपाशी ओरडून सांगत होता, तोच महाराजांच्या तलवारीने त्याचा अंत झाला. ‘आता खान सापडला’ म्हणेतोवर मिणमिणता प्रकाश कोणी तरी फुंकून बंद केला. त्या मोठ्या खोलीला असलेल्या दुसर्‍या दरवाजातून खान खाली सटकला. महाराज खानाला शोधत होते. समोर आलेल्याला अंधारात मारताना काही आवाज पुरुषांचे होते. त्यात एखादा जखमी झाल्याचा आवाज खानाचा नक्‍की असावा, असे महाराजांना वाटत होते. खाली उतरलेले महाराजांच्या अंगरक्षकांच्या समोर येताच भोसकून गारद होत होते. 
खानाने सगळी धांदल पाहून तातडीने एका बाजूच्या लहान खिडकीतून खाली लटकून राहावे असा विचार करून, शेजारच्या एका खिडकीतून आपले जाडजूड अंग दाबून त्यातून जायला सुरुवात केली. नेमक्या त्याच वेळी महाराजांनी अंधारात खिडकीपाशी हालचाल पाहिली. तो खान होता. खिडकीच्या कठड्याला दोन्ही हातांनी धरून तो लटकून होता. तोपर्यंत मनगटावर वार पडला. पुन्हा एकदा तलवार खिडकीच्या बाजूच्या भिंतीवर खरडून तो वार उजव्या हाताच्या बोटांवर पडला. करंगळी अन् अंगठा सोडून बाकी तीन बोटांनी घाव सोसून तुकडे करून घेतले. रक्‍ताच्या चिळकांड्या उडताच, हात झटकत खानाने दोन्ही हात सोडले. त्याचे बोजड शरीर खाली पडलेल्या शवांवर लुडकले. खान जखमी झाला. महाराजांनी आपले अंगरक्षक पुन्हा वरच्या मजल्यावर पाठवून कोणी उरले असतील, तर मारायला आज्ञा केली. 

एकाएकी कर्णे, ढोल, ताशांचे आवाज बाहेरून मोठमोठ्याने येऊ लागले. लालमहालाबाहेरचे गस्ती सैनिक डोळ्यांवरची झापड सोडून आवाजाच्या दिशेने धावले. तोपर्यंत आणखी कुठून कुठून ढोल-ताशे वाजायला लागले. एकच गहजब झाला. आधी ठरल्याप्रमाणे जोवर आवाज होत आहे, तेवढ्यात नदीच्या पात्रात उतरून भांबुर्ड्यातून पाताळेश्‍वराकडे धावत सुटायचे. त्यामुळे जो तो भटारखान्यातून मागच्या दाराने नदीकडे धावला. दुसर्‍या कंपनीने तीन घोडे तयार ठेवले होते. त्यावर दोन अंगरक्षकांच्या समवेत महाराज चतुश्रुंगीच्या डोंगराला वळसा घालून पाषाण गावाकडे सटकले. महाराज बावधनपर्यंत येता-येता उजाडायला लागले. शाहिस्तेखानाच्या पसार्‍यातील काही सरदारांच्या राहुट्या पार धायरीपर्यंत लागलेल्या होत्या. त्यांना चुकवत, डोणजेवरून सिंहगडाच्या पायथ्याशी अटकरवाडीत महाराजांनी तासभर विश्रांती घेतली. आता खानाचे सैन्य इथंवर यायची शक्यता नव्हती.

त्यांचे बाकीचे साथीदार हळूहळू जमा होत राहिले. खान या मारकाटीत नक्‍की मेला किंवा जबर जखमी झाला असावा, असे ते एकमेकांत चर्चा करत राहिले.  मागे राहिलेल्यांपाशी परवाना होता. ते तो दाखवत आतल्या आत फिरत राहून ‘कालच्या रातीचा’ हालहवाला काढत होते. ते परतले तेव्हा खानाचा जीव वाचला आहे, हाताला जबर फटका बसला आहे, काही बोटे तुटली आहेत समजले. त्या रात्री 51 जण मेले. त्यात मुलगा, जावई, 12 बेगमा, अन्य घरचे नातलग होते. लालमहालातील जनानखान्यात वावरणार्‍या बायका, नोकरचाकर 100 च्या वर जबर जखमी झाले, अशा बातम्या घेऊन आले.