Sun, Dec 15, 2019 05:08होमपेज › National › काँग्रेसला धक्का; राज्यसभेच्या 'त्या' जागांसाठी वेगवेगळेच मतदान!  

काँग्रेसला धक्का; राज्यसभेच्या 'त्या' जागांसाठी वेगवेगळेच मतदान!  

Published On: Jun 25 2019 1:19PM | Last Updated: Jun 25 2019 1:19PM
नवी दिल्ली :  पुढारी ऑनलाईन

गुजरातमधील राज्यसभेच्या दोन रिक्त जागांवर एकाचवेळी मतदान घेण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेल्या काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार देत निवडणूक आयोगाच्या दोन जागांवर वेगवेगळे मतदान घेण्याच्या निर्णयाला हिरवा कंदिल दाखविला आहे.

अमित शहा आणि स्मृती इराणी यांनी लोकसभा निवडणूक जिंकल्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या दोन जागांवर ५ जुलै रोजी मतदान होणार आहे. मात्र, दोन्ही जागांवर वेगवेगळे मतदान होईल. या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला गुजरात काँग्रेसचे नेते परेशभाई धनानी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

यावर सुर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने गुजरात काँग्रेसला म्हटले आहे की. निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर आम्ही त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. दोन जागांवर वेगवेगळे मतदान घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला तुम्हाला आव्हान द्यायचे असेल तर तुम्ही निवडणूक याचिका दाखल करू शकता.

गुजरातमधील दोन जागांवर वेगवेगळे मतदान घेणे यात बेकायदेशीर असे काहीच नाही. ही प्रक्रिया १९५७ पासून अवलंबिली जात आहे. यामुळे काँग्रेसची याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी निवडणूक आयोगाने २३ जून रोजी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती.

दरम्यान भाजपने राज्यसभेच्या रिक्त दोन जागांवर परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर आणि जुगलजी ठाकोर यांनी उमेदवारी दिली आहे. त्यासाठी त्यांनी आज अर्ज देखील दाखल केला.
गुजरात विधानसभेत भाजपकडे १०० जागा आहेत. तर काँग्रेसकडे ७१ आमदार आहेत. राज्यसभेसाठी संबंधित राज्यांतील आमदार मतदान करतात. या आमदारांना दोन जागांसाठी वेगवेगळे मतदान करायला हवे.