Thu, Aug 22, 2019 14:34होमपेज › National › विरोधकांची मोट बांधण्यासाठी सोनिया गांधींनी घेतला पुढाकार

विरोधकांची मोट बांधण्यासाठी सोनिया गांधींनी घेतला पुढाकार

Published On: May 17 2019 2:15AM | Last Updated: May 17 2019 2:15AM
नवी दिल्ली : जाल खंबाटा

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा (संपुआ) सोनिया गांधी यांनी 23 मेच्या लोकसभा निवडणूक निकालानंतर सरकार स्थापन करण्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्यात पुढाकार घेतला आहे. ‘संपुआ’चे जुने घटकपक्ष आणि ‘रालोआ’तील नाराज घटक पक्षांसह तटस्थ प्रादेशिक पक्षांच्या दिग्गज नेत्यांशी संपर्क करण्याची जबाबदारी सोनिया गांधी यांनी त्यांचे अत्यंत विश्‍वासू आणि अ. भा. काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष अहमद पटेल तसेच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्यावर सोपवली आहे.

लोकसभेची त्रिशंकू स्थिती गृहीत धरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी, त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांना निवडणुकीनंतर आघाडी बनविण्याची विनंती केल्याने, सोनिया यांनी तातडीने अनौपचारिक चर्चा सुरू केली आहे. 

सोनिया यांची व्यूहरचना

लोकसभा निवडणुकीत परस्परांविरुद्ध जरी लढलो असलो, तरी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी निवडणुकीनंतरची आघाडी बनवून सरकार स्थापण्यासाठी सर्वप्रथम दावा करायचा, त्यासाठी सर्वांनी सर्वप्रथम राष्ट्रपती भवन गाठायचे, अशी सोनिया यांची व्यूहरचना आहे. त्यासाठी त्यांनी अहमद पटेल, गुलाम नबी आझाद यांच्या मदतीला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनाही दिले आहे.

24 मे रोजी विरोधकांची बैठक

23 मे रोजी दुपारी निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट होण्यास प्रारंभ होईल. त्याचवेळी सोनिया यांनी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक व्हावी अशी इच्छा विरोधी पक्षांच्या नेत्यांना बोलून दाखविली. सरकार स्थापण्यासाठी जराही वेळ वाया जाऊ नये, ही त्यामागची भूमिका आहे. मात्र बहुसंख्य विरोधी पक्षनेत्यांनी 24 मे रोजी उपलब्ध होणार असल्याचे सांगितल्याने ही बैठक 24  रोजी होणार आहे. 

सोनिया गांधी यांनी 2004 साली ‘संपुआ’ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेत, काँग्रेसच्या नेतृत्वात बिगर भाजप सरकार स्थापन केले होते. त्यांनतर ‘संपुआ’च्याच नेतृत्वात हे सरकार पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दहा वर्षे चालविले. यावेळीही सोनिया ‘संपुआ’च्या घटक पक्षांच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांचा अथवा स्वत:च्या रायबरेली मतदार संघातही सोनिया प्रचार करू शकल्या नाहीत. तथापि, विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीसाठी मात्र त्या सदैव उपलब्ध असतात, असे 10 जनपथच्या सूत्रांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचे मनसुबे बाळगणार्‍या आणि तटस्थ असलेल्या बिजू जनता दल आणि तेलंगणा राष्ट्र समिती यासारख्या प्रादेशिक पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या संपर्कात सोनिया आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही दोन दिवसांपूर्वी 21 मेच्या दिल्लीतील संभाव्य बैठकीबद्दलच सूतोवाच केले होते. मात्र, या बैठकीत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी, बसपा सुप्रीमो मायावती आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे उपस्थित राहणार काय, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. केंद्रात सरकार स्थापन करण्यास संबंधित तीन प्रमुख पक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

राष्ट्रपतींच्या संभाव्य भूमिकेची विरोधकांना चिंता

भाजपला जरी स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तरीही भाजपने नियुक्त केलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण देऊ शकतात. कोविंद यांच्या या संभाव्य भूमिकेची चिंता विरोधी पक्षांना भेडसावत आहे. या भीतीपोटीच सर्व विरोधी पक्ष 21 मे रोजी दिल्लीत मसलतीसाठी एकत्र येण्याची शक्यता आहे.