Mon, Aug 19, 2019 15:54होमपेज › National › ‘ऑपरेशन कमळ’वरून गदारोळ

‘ऑपरेशन कमळ’वरून गदारोळ

Published On: Feb 12 2019 1:13AM | Last Updated: Feb 12 2019 1:13AM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

कर्नाटकमधील भाजपच्या ‘ऑपरेशन कमळ’वरून लोकसभेत सोमवारी मोठा गदारोळ झाला. गोंधळामुळे प्रश्‍नोत्तराचा तास वाया गेला; तर शून्य प्रहरात काँग्रेसचे गटनेते मल्‍लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणावेळी भाजप खासदारांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करीत भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. या मुद्द्यावरून काँग्रेस सदस्यांनी नंतर सभात्याग केला.

लोकसभेत प्रश्‍नोत्तराचा तास सुरू होताच ‘ऑपरेशन कमळ’वर चर्चा घेण्याची मागणी काँग्रेस सदस्यांनी केली. कर्नाटकमधील काँग्रेसच्या आमदारांना राजरोसपणे लाच देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे सदस्य के. सी. वेणुगोपाल यांनी केला. आमदारांना लाच देण्याच्या ‘ऑडिओ टेप’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांची नावे आल्याने हे प्रकरण गंभीर बनले असल्याचे त्यांनी सांगितले. वेणुगोपाल यांच्या वक्‍तव्यावर भाजपच्या सदस्यांनी आक्षेप नोंदवला. यावर काँग्रेसच्या सदस्यांनी वेलमध्ये येत जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी वारंवार आवाहन करूनही गदारोळ न थांबल्याने अखेर अध्यक्षांनी कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब केले. शून्य प्रहरात मल्‍लिकार्जुन खर्गे तसेच माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांनी पुन्हा हा मुद्दा उपस्थित केला.

कर्नाटकात घोडेबाजार

कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार सुरू असल्याचे सांगतानाच येडियुरप्पा आणि एका काँग्रेस नेत्यादरम्यानच्या झालेल्या संभाषणाची प्रत वाचून दाखविण्याचा खर्गे यांनी प्रयत्न केला. याला भाजपच्या शोभा करंदलांजे, सदानंद गौडा आणि प्रल्हाद जोशी यांनी जोरदार आक्षेप घेतला. काँग्रेसवाल्यांची ही ‘ऑडिओ टेप’ बनावट असल्याचे सदानंद गौडा यांनी सांगितले. राज्यात काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (निजद) नेते एकमेकांचे पाय खेचत आहेत.

आपापसातील मतभेद आणि लाथाळ्या दररोज बाहेर येत आहेत. दुसरीकडे काँग्रेसमध्ये एकमेकांविरोधात कुरघोड्या सुरू आहेत. आमदारांमध्येच हाणामारी सुरू असून एका आमदाराला तर दहा दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. हे सर्व प्रकार झाकून टाकण्यासाठी काँग्रेसवाले ‘कर’नाटक करीत असल्याचे सदानंद गौडा म्हणाले. देवेगौडा यांनी दहा आमदार इकडून तिकडे गेले; तर दुसर्‍या पक्षाचे सरकार कसे काय बनते, असा सवाल उपस्थित करीत अशा प्रकारच्या घोडेबाजाराला लगाम घालण्यासाठी घटनेत तरतूद करावी, अशी मागणी केली. देवेगौडा यांचे सुपुत्र व कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी गेल्या सोमवारी भाजप नेते येडियुरप्पा व काँग्रेसच्या एका नेत्यादरम्यानच्या संभाषणाची ‘ऑडिओ टेप’ जारी केली होती. आपल्याकडे ‘ऑपरेशन कमळ’चे आणखीही पुरावे असल्याचा दावा कुमारस्वामी यांनी केला होता.