Sun, Jan 19, 2020 16:52होमपेज › National › जे. पी. नड्डा भाजपचे कार्यकारी अध्यक्ष; अमित शहांकडेच अध्यक्षपद राहणार

जे. पी. नड्डा भाजपचे कार्यकारी अध्यक्ष; अमित शहांकडेच अध्यक्षपद राहणार

Published On: Jun 17 2019 8:01PM | Last Updated: Jun 17 2019 9:05PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांची निवड झाली. अध्यक्षपद अमित शहा यांच्याकडेच राहणार आहे. भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयामध्ये संसदीय बोर्डाची बैठक आज (ता.१७)  पार पडली. या बैठकीमध्ये नड्डा यांच्या कार्यकारी अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नड्डा पक्षाचे दैनंदिन कामकाज पाहतील. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. जगतप्रकाश नड्डा यांची निवड पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून करण्यात आली असल्याचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर केले.

या संदर्भात पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटले की, अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने अनेक निवडणुकांमध्ये विजय मिळविला आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही शहा यांनीच सर्व सूत्रे सांभाळली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांच्यावर गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपविल्यानंतर स्वत: शहा यांनीच पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी अन्य नेत्याकडे सोपविण्यात यावी, असे म्हटले होते. अमित शहा हे पुढील सहा महिने राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. त्यानंतर सांसदीय पक्षाने जगतप्रकाश नड्डा यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली आहे. तर पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका होईपर्यंत नड्डा कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील, असेही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.
 
सतराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनास सोमवारपासून सुरुवात झाली. त्या पार्श्वभूमीवर भाजप संसदीय बोर्डाची बैठक पार पडली. बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री व पक्षाध्यक्ष अमित शहा, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, दळणवळण मंत्री नितीन गडकरी, सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत, भाजप नेते जे. पी. नड्डा, राष्ट्रीय संघटनमंत्री रामलाल यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
 
नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडणारे हिमाचल प्रदेशचे 58 वर्षीय जे. पी. नड्डा भाजपमध्ये रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. 2014 मध्येही पक्षाध्यक्षपदाच्या शर्यतीत नड्डा होते. मात्र, मोदी यांनी त्यांचे खास विश्‍वासू अमित शहा यांना भाजपचे अध्यक्ष बनविल्याने त्यांचे नाव मागे पडले. यावेळी मात्र अमित शहा यांना मंत्रिपदाची जबाबदारी दिल्याने नड्डा यांना कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाच राहतील. 

नड्डा हिमाचल प्रदेशातील ब्राह्मण कुटुंबातील असून भाजपच्या उच्चस्तरीय वर्तुळाच्या मर्जीतील आहेत. त्याचबरोबर अमित शहा यांचेही अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. नड्डा भाजपच्या संसदीय बोर्डाचे सदस्य आहेत. त्याच बोर्डाकडून भाजपचे धोरणात्मक निर्णय घेतले जातात. नड्डा यांच्या नावाबरोबरच भूपेंद्र यादव यांचेही नाव आघाडीवर होते. भूपेंद्र यादव यांनी भाजपमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सध्या ते राजस्थानमधून राज्यसभेवर खासदार आहेत. त्याचबरोबर ते पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.