Fri, Aug 23, 2019 15:29होमपेज › National › अखिलेश यादव यांना विमानतळावर रोखले; समाजवादी कार्यकर्त्यांचा राडा 

अखिलेश यादव यांना विमानतळावर रोखले; समाजवादी कार्यकर्त्यांचा राडा 

Published On: Feb 12 2019 6:51PM | Last Updated: Feb 12 2019 6:51PM
लखनऊ : पुढारी ऑनलाईन

अलाहाबाद विद्यापीठातील शपथविधी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जाताना उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना लखनऊ येथील चौधरी चरण सिंह विमानतळावर रोखले. याबाबतची माहिती अखिलेश यांनी ट्वीट करून दिली. या प्रकारानंतर विमानतळावर तसेच अलाहाबाद विद्यापीठ परिसरात तणाव स्थिती निर्माण झाली. 

समाजवादीच्या कार्यकर्त्यांनी विमानतळावर निदर्शने करून सरकारविरोधात घोषणा दिल्या. या घटनेच्या निषेधार्थ अलाहाबाद विद्यापीठ परिसरात समाजवादी कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्यात समाजवादीचे खासदार धमेंद्र यादव जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

या घटनेचे पडसाद राज्य विधीमंडळ अधिवेशनातही उमटले. समाजवादीच्या आमदारांनी या घटनेच्या निषेधार्थ सभागृहात घोषणा दिल्या. तसेच समाजवादी पक्षाचे आमदारांनी राजभवनाच्या बाहेर धरणे आंदोलन केले.

आपल्याला कोणत्याही कारणाशिवाय विमानतळावर विमानात चढण्यापासून रोखले. यावरून उत्तर प्रदेश सरकार विद्यार्थी संघटनेच्या शपथग्रहण कार्यक्रमावरून किती घाबरली आहे, हेच स्पष्ट होते. आपल्याला विमानतळावर रोखणे हे सरकारचे कारस्थान आहे, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.

अखिलेश यादव यांना विमानतळावर रोखल्यानंतर राजकीय क्षेत्रातून सरकारविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. माजी मुख्यमंत्र्यांना रोखण्याचा प्रकार दुदैवी आहे. असा प्रकार देशात कधी घडला नसेल. या घटनेचा मी निषेध करत आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांनीही या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला आहे. समाजवादी- बहुजन समाज पक्षाच्या युतीची भाजपने धास्ती घेतली आहे. त्यामुळे ते अखिलेश यांना प्रयागराजला जाण्यासाठी रोखत आहेत, हेच स्पष्ट होते, असे मायावती यांनी म्हटले आहे.