Wed, Jun 03, 2020 00:00होमपेज › National › दिल्लीत निमलष्कर

दिल्लीत निमलष्कर

Last Updated: Feb 27 2020 2:53AM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

बहुतांश ईशान्य दिल्ली हिंसाचाराने होरपळून निघाली असून एका पोलीस कर्मचार्‍यासह गुप्तचर खात्यातील एक कर्मचारीही मृत्युमुखी पडल्याने या दिल्‍ली दंगलीतील बळींची संख्या  27 वर पोहोचली आहे. दिल्‍ली विझण्याची चिन्हे नाहीत हे लक्षात येताच राष्ट्रीय सुरक्षा सल्‍लागार अजित डोवाल बुधवारी दंगलग्रस्त भागात स्वतः उतरले. कायदा व सुव्यवस्थेची सूत्रेही आता तेच हाताळणार आहेत. दंगलग्रस्त भागात निमलष्करी दल तैनात करण्यात आले असून खबरदारी म्हणून दहावी, बारावीच्या बुधवारच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. पंतपधान नरेंद्र मोदी यांनीही दिल्‍लीकरांना शांतता व एकतेचे आवाहन केले आहे. 

बुधवारी सकाळी गोकुलपुरीत भंगार बाजारात असलेल्या दुकान क्रमांक 15 ची अज्ञातांनी जाळपोळ केली. सोमवारपासून बाजारातील दुकानांची जाळपोळ सुरू आहे. मात्र, सुरक्षेअभावी अग्‍निशमन बंब परिसरात पोहोचू शकले नाही. बाजार त्यामुळे पूर्णत: जळून खाक झाला. बृजपुरी परिसरात एका घराला आग लावण्यात आली. 

ईशान्य दिल्‍लीत कलम 144 लागू करण्यात आले असून ही जमावबंदी महिनाभर कायम राहील. हिंसाचारग्रस्त भागामध्ये निमलष्करी दलाच्या 45 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. निमलष्करी दलाचे जवान पोलीस कर्मचार्‍यांसोबत मिळून परिसरात गस्त घालत आहेत. एकाच वेळी सुप्रीम कोर्ट आणि दिल्‍ली उच्च न्यायालयाने पोलिसांच्या भूमिकेवर ताशेरे ओढल्यामुळे पाच पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या असून विशेष आयुक्‍त कायदा व सुव्यवस्था म्हणून एस. एन. श्रीवास्तव यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

दिल्लीतील स्थितीचा विस्तृत आढावा घेण्यात आला असून पोलिस व इतर यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले. शांतता आणि सुसंवाद राखणे ही आपली जबाबदारी आहे. मी दिल्लीच्या माझ्या भावांना आणि बहिणींना आवाहन करतो की, त्यांनी कायम शांतता आणि बंधुत्व जपावे. दिल्ली शहर शांत राहावे आणि लवकरात लवकर पूर्वपदावर यावे, असेही मोदी यांनी संदेशात म्हटले आहे.

दिल्लीतील परिस्थितीवर  चर्चा करण्यासाठी बुधवारी सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक बोलावण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे यावेळी उपस्थित होते. त्यानंतर डोवाल थेट हिंसाचारग्रस्त मौजपूर, जाफराबाद तसेच घोंडा भागात रस्त्यावर उतरले. स्थानिक लोकांशी त्यांनी प्रचंंड बंदोबस्तात संवाद साधला. पोलिस त्यांचे काम नीट करीत नाहीत. नागरिक दहशतीत जगत आहेत. मदतीसाठी ओरड करूनही पोलिसांकडून कुठलेही सहकार्य मिळाले नाही, अशी तक्रार स्थानिकांनी डोवाल यांच्यासमक्ष केली. सीलमपूर परिसरातील पोलिस उपायुक्‍तांच्या कार्यालयात दुपारी डोवाल पोहोचले होते.

पोलिस आणि सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्‍त करीत  घोंडा परिसरात  हिंसाचार पीडितांनी डोवाल यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मंगळवारी रात्रीपासूनच डोवाल यांनी दिल्लीतील कायदा-सुव्यवस्थेची सूत्रे हाती घेतली आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसोबत रात्रीपासून त्यांनी अनेक भागांचा दौरा केला. 

लष्कराला पाचारण करा; केजरीवाल 

हिंसाचारग्रस्त भागात लष्कराला पाचारण केले जावे, अशी मागणी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केली आहे. ईशान्य दिल्लीतील परिस्थिती गंभीर असून सर्व प्रयत्न करूनही पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश मिळालेले नाही, असे केजरीवाल म्हणाले.