Tue, Aug 20, 2019 15:11होमपेज › National › गोध्राप्रकरणी जुलैमध्ये पुन्हा सुनावणी; मोदींच्या अडचणी वाढणार?

गोध्राप्रकरणी जुलैमध्ये पुन्हा सुनावणी; मोदींच्या अडचणी वाढणार?

Published On: Feb 11 2019 4:57PM | Last Updated: Feb 11 2019 4:48PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोध्रा हत्याकांड प्रकरणात विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) क्लिन चिट मिळाली आहे. याविरोधात झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने जुलैपासून आव्हान याचिकेवर सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे आव्हान याचिकेवर सुनावणी होणार आहे. याप्रकरणात आव्हान देणाऱ्या झाकिया जाफरी या 2002 साली झालेल्या गोध्रा हत्याकांडातील मृत खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी आहेत. त्यांनी विशेष तपास पथकाच्या निर्णयाविरोधात गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु, न्यायालयाने 5 ऑक्टोबर 2017 रोजी एसआयटीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली होती. त्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. 

गोध्रा प्रकरणात विशेष तपास पथकाने 8 ऑक्टोबर 2012 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 63 जणांना क्लिन चिट दिली होती. यामध्ये काही वरीष्ठ अधिकारीही होते. या सर्वांविरोधात कोणतेही सबळ पुरावे नसल्याचे या अहवालात म्हटले होते. 

दरम्यान, न्यायालयाने सुनावणीपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी केलेल्या अर्जाची माहिती घेणार असल्याचे म्हटले आहे. सेटलवाड या प्रकरणातील झाकिया जाफरी यांच्या सहयाचिकाकर्त्या आहेत.