Tue, Oct 24, 2017 16:59
29°C
  Breaking News  





होमपेज › National › दहशतवाद्यांशी लढणार रोबो

दहशतवाद्यांशी लढणार रोबो

Published On: Aug 13 2017 2:25AM | Last Updated: Aug 13 2017 2:14AM

बुकमार्क करा





नवी दिल्ली : वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात मोहीम चालवणार्‍या भारतीय लष्कराच्या जवानांना आता रोबोट्सचे पाठबळ मिळणार असून त्यामुळे लष्कराची ताकद अनेक पटीने वाढणार आहे.

दहशतवाद्यांविरोधात लढताना आजवर अनेक जवान शहीद झाले आहेत. ते टाळण्यासाठीच आता रोबोट्सचा उपाय शोधण्यात आला आहे. येत्या काळात दहशतवाद्यांशी लढताना भारतीय लष्कराला रोबोट्सची बहुमूल्य मदत मिळणार आहे. रोबोट्स हे एक यंत्र असल्याने त्याला गोळीबार आणि स्फोटांची काळजी असणार नाही. यामुळे मनुष्यहानी टाळता येणार आहे. त्याचबरोबर हे रोबोट्स युद्ध आणि हल्ल्यांच्या वेळी संवेदनशील ठिकाणी लष्कराला हत्यारे व दारूगोळा पुरवण्याचे काम करणार आहेत. गोळीबार सुरू असताना जवानांना अशा ठिकाणी दारूगोळा घेऊन जाताना जीवाला धोका असतो.  रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने चालणारे हे रोबोट्स अशावेळी सहज लष्कराला मदत करू शकतात. हे रोबोट्स हे देशातच तयार केले जाणार आहेत. भारतीय लष्कराने अशा प्रकारच्या 544 रोबोट्सची मागणी संरक्षण मंत्रालयानेे केली आहे. लष्कराच्या या मागणीला संरक्षण मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला असून या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील गावे आणि जंगलांनंतर आता शहरांमध्येही हातपाय पसरायला लागले आहेत. यासाठी लष्कराला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज भासणार आहे. हलक्या आणि मजबूत रोबोट्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि संपर्क यंत्रणेची सुविधा असणार आहे. हे रोबोट्स आपल्या मुख्य केंद्रापासून 200 मीटरच्या रेंजमध्ये काम करू शकणार आहेत. ही यंत्रे अशी असायला हवीत जी अवघड ठिकाणीही ग्रेनेड आणि हत्यारांचा पुरवठा करू शकतील, असे लष्कराने आपल्या यादीमध्ये म्हटले आहे.