होमपेज › National › पूरग्रस्त केरळमधील नद्या, विहिरी कोरड्या

पूरग्रस्त केरळमधील नद्या, विहिरी कोरड्या

Published On: Sep 13 2018 1:51AM | Last Updated: Sep 12 2018 9:06PMतिरुवनंतपूरम : वृत्तसंस्था

गत महिन्यात केरळमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडाला होता. प्रचंड प्रमाणात आलेल्या पुराच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी केली होती. मात्र, आता राज्यातील अनेक भागांमध्ये अनेक नद्या व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. या धक्‍कादायक प्रकाराने केरळ सरकारची झोप उडाली आहे. याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी संशोधकांना अभ्यास करण्याची सूचना राज्य सरकारने दिली आहे.

मुख्यमंत्री पी. विजयन यांनी राज्य विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण परिषदेच्या संचालकांना अभ्यास करण्यासंदर्भात सांगितले आहे. आता या प्रकारामागील कारणे आणि त्यावरील उपायांबाबत मांडणी केली जाणार आहे. या कामामध्ये जवाहरलाल नेहरू ट्रॉपिक बॉटिनिक गार्डन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, केरळा फॉरेस्ट रिसर्च इस्टिट्यूट आणि मलबार बॉटनिकल गार्डन अ‍ॅण्ड इन्स्टिट्यूट फॉर प्लान्ट सायन्स या संस्था सहभागी आहेत. गत महिन्याभरात केरळमधील अनेक भागांतील नद्या आणि विहिरीच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. तसेच भूजल पातळीतही घट झाली आहे.  पुरामुळे भूगर्भातील रचनेत काही प्रमाणात बदल झाले असावेत. यामुळेच भूगर्भातील पाणी अन्य ठिकाणी जाण्याचा धोका असतो. यातूनच भूजलपातळी कमी झाल्याचे दिसून येत आहे. पेरियार, भारथपुझा, पम्पा आणि कबानी आदी नद्या कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. या नद्यांच्या प्रदेशात येणार्‍या अनेक जिल्ह्यांतील विहिरीही कोरड्या पडल्या आहेत. 

असा होणार अभ्यास

यासंदर्भातील अभ्यास दोन पातळ्यांवर होणार असून, संशोधकांची दोन पथके यासाठी नियुक्‍त करण्यात आली आहेत. ज्यामध्ये पहिला अभ्यास जैवविविधतेवर होणार आहे, तर दुसरा अभ्यास या भागातील प्राण्यांची जीवनशैली आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम यावर होणार आहे.