Sun, Oct 20, 2019 11:24होमपेज › National › रेल्वेचा एसी प्रवास महागणार 

रेल्वेचा एसी प्रवास महागणार 

Published On: Jul 18 2019 8:42PM | Last Updated: Jul 18 2019 8:42PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

गरीब आणि मध्यमवर्गीयांना एसीतून प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेली गरीब रथ एक्स्प्रेस ही रेल्वे लवकरच बंद करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून तशी पावले उचलली जात आहेत. सूत्रांच्या मते, गरीब रथ ट्रेनसाठी नवीन कोच किंवा डबे बनवणे थांबवण्याचा आदेश जारी केला गेला आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार सरकार गरीब रथ रेल्वेला मेल किंवा एक्स्प्रेस रेल्वेमध्ये बदलणार आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की, येत्या काळात गरीब रथ रेल्वेच्या जागी मेल किंवा एक्स्प्रेस रेल्वे चालवल्या जातील. मंत्रालयातर्फे त्या दिशेने कामासाठी पावले उचलली गेली आहेत. यासह 12 कोच ऐवजी 16 कोचची रेल्वे चालवली जाणार आहे. 2006 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी गरीब रथ एक्स्प्रेस सुरू केली होती. 

काठगोदाम-कानपूर ‘गरीब रथ’ झाली बंद

काठगोदाम-जम्मू आणि काठगोदाम-कानपूर गरीब रथ रेल्वेला मेल एक्स्प्रेसमध्ये बदलण्यात आले आहे. म्हणजेच या मार्गावर गरीब रथ ट्रेनचा प्रवास बंद झाला आहे. त्यामुळे आता रेल्वेचा प्रवासही महागणार आहे. जर दिल्लीतून बांद्रा गरीब रथमधून प्रवास केला तर 1020 रुपये द्यावे लागतील. तर हाच प्रवास मेल किंवा एक्स्प्रेस ट्रेनने केला तर तुम्हाला 1500-1600 रुपये द्यावे लागतील.