Thu, Mar 21, 2019 01:02होमपेज › National › राहुल यांच्या इफ्तार पार्टीस प्रणवदांची उपस्थिती

राहुल यांच्या इफ्तार पार्टीस प्रणवदांची उपस्थिती

Published On: Jun 14 2018 1:46AM | Last Updated: Jun 14 2018 1:27AMनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी दिलेली इफ्तार पार्टी विरोधकांचे ‘गेट टुगेदर’करणारी ठरली. विशेष म्हणजे इफ्तार पार्टीस माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही हजेरी लावल्याने मुखर्जी - काँग्रेस यांच्यातील संबंधांमध्ये कटुता आल्याच्या चर्चेच पूर्णविराम मिळाला आहे. त्याचप्रमाणे झारखंड मुक्‍ती मोर्चाचे हेमंत सोरेन यांच्या उपस्थितीनेही नव्या चर्चेस प्रारंभ झाला आहे.

काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत विरोधकांची संयुक्‍त आघाडी निर्माण करण्यावर भर दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यात विशेष लक्ष घातले असून, त्यासाठी त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी आयोजित इफ्तार पार्टीस माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी हजेरी लावत काँग्रेससोबतच्या संबंधात कटुता नसल्याचे संकेत दिले आहेत. यापूर्वी इफ्तार पार्टीस मुखर्जी यांना आमंत्रण नसल्याची चर्चा होती. त्याचप्रमाणे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारीदेखील उपस्थित होते.
काँग्रेसतर्फे अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, अहमद पटेल, लोकसभेतील सभागृह नेते मल्लिकार्जुन खर्गे, आनंद शर्मा, गुलामनबी आझाद, अशोक गेहलोत, शिवराज पाटील - चाकूरकर, ए. के. अँटोनी, शिला दीक्षित आदी उपस्थित होते.

इफ्तार पार्टीस सीपीआयतर्फे सीताराम येच्युरी, शरद यादव, राष्ट्रवादीतर्फे डी. पी. त्रिपाठी, डीएमकेतर्फे कनिमोळी, राजदतर्फे मनोज झा आणि झारखंड मुक्‍ती मोर्चातर्फे हेमंत सोरेन, निजदतर्फे दानिश अली आदी उपस्थित होते. हेमंत सोरेन यांच्या उपस्थितीस विशेष महत्त्व असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांच्या संभाव्य आघाडीत झारखंड मुक्‍ती मोर्चादेखील सहभागी होणार का, या चर्चेस त्यामुळे जोर आला आहे.

बसपाप्रमुख मायावती, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनादेखील आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे त्यांची उपस्थिती नव्हती.