Tue, Jul 14, 2020 08:15होमपेज › National › राहुल गांधीच काँग्रेस अध्यक्षपदी राहतील

राहुल गांधीच काँग्रेस अध्यक्षपदी राहतील

Published On: Jun 13 2019 1:29AM | Last Updated: Jun 13 2019 12:12AM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी कायम राहतील, अशी माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी दिली प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीस ज्येष्ठ नेते ए. के.अँटोनी, अहमद पटेल, जयराम रमेश, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सूरजेवाला म्हणाले, राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष होते, आहेत आणि राहतील. राहुल यांच्या अध्यक्षपदाबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदासाठी पर्याय शोधला जात असल्याच्या प्रश्‍नांना अर्थच उतरत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद सोडण्याची तयारी दर्शवली असून, काँग्रेस नेते त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी आपल्या मतावर ठाम असल्याचे कळत होते; पण सूरजेवाला यांनी राहुल गांधीच काँग्रेस अध्यक्षपदी कायम राहतील, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. दरम्यान, बुधवारच्या बैठकीस ‘संपुआ’च्या अध्यक्ष सोनिया गांधी उपस्थित राहू न शकल्याने लोकसभेतील काँग्रेस नेतेपदासाठी नाव निश्‍चित होऊ शकले नाही.