होमपेज › National › सत्यपाल मलिक यांचे आव्हान राहुल गांधी यांनी स्वीकारले

सत्यपाल मलिक यांचे आव्हान राहुल गांधी यांनी स्वीकारले

Published On: Aug 14 2019 12:10AM | Last Updated: Aug 13 2019 11:36PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

काँग्रेस नेते राहुल गांधी लवकरच काश्मीर आणि लडाखचा दौरा करण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल यांना काश्मीरला येण्याचे आव्हान दिले होते. ते राहुल यांनी स्वीकारले आहे. विरोधी पक्ष नेत्यांचे एक शिष्टमंडळ तेथे जाईल, आम्हाला विमानाची गरज नाही, असे राहुल यांन ट्विटरवर म्हटले आहे. 

ट्विटरवर राहुल म्हणाले आहेत की, आदरणीय राज्यपाल तुमच्या आव्हानानुसार मी आणि विरोधी पक्ष नेत्यांचे शिष्टमंडळ जम्मू-काश्मीर आणि लडाखचा दौरा नक्की करू. आम्हाला विमानाची गरज नाही. कृपया आम्हाला प्रवास करण्यास आणि लोकांना भेटण्याचे स्वातंत्र्य द्यावे. याशिवाय, प्रमुख नेते आणि तेथील सैनिकांना भेटण्याचेही स्वातंत्र्य मिळावे. 

राहुल यांनी काश्मीर खोर्‍यातील कथित हिंसेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले होते की, तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात, तुम्ही अशा पद्धतीने बोलू नका. काश्मीरमधील सद्यःस्थिती माहिती व्हावी, यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासाठी मी विमान पाठवेन. तुम्ही येथील परिस्थितीचा आढावा घ्या आणि मग बोला.