Sat, Dec 15, 2018 20:32होमपेज › National › कच्च्या तेलाची खरेदी डॉलरऐवजी रुपयात

कच्च्या तेलाची खरेदी डॉलरऐवजी रुपयात

Published On: Dec 07 2018 1:51AM | Last Updated: Dec 07 2018 12:31AM
नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था

इराणसह आखाती देशातून कच्च्या तेलाची खरेदी आता डॉलरऐवजी रुपयामध्ये होणार आहे. यासंदर्भात एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामध्ये इराणी तेल खरेदीसाठी अमेरिका व भारतासह अन्य सात राष्ट्रांनी या करारावर सह्या केल्या आहेत. अमेरिकेने 5 नोव्हेंबर रोजी इराणवर निर्बंध लागू केले होते. भारतासह अन्य आठ राष्ट्रांना मात्र अमेरिकेने इराणमधून तेल खरेदीची मुभा दिली होती.

डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारताने इराणमधून तेल खरेदी रुपयात करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणमधील युको बँकेत कच्च्या तेलाच्या खरेदीची रक्‍कम वर्ग करण्यात येणार आहे. याच बँकेत इराणमध्ये निर्यात केलेल्या जाणार्‍या वस्तूंच्या खरेदीची रक्‍कमही ठेवली जाणार आहे. जेणेकरून कच्च्चा तेलाच्या खरेदीचे पैसे देणे भारतास सोयीचे होणार आहे.

भारताला प्रतिदिन 3 लाख बॅरल कच्चे तेल आयात करण्याची परवानगी आहे. चीननंतर इराणी तेल खरेदी करणारा सर्वात मोठा ग्राहक भारत देश आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी), मंगलोर, रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेडच्या रिफायनरीमध्ये या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये 1.25 दशलक्ष टन तेल विकत घेतले. भारत जगातील तिसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल ग्राहक असून ते 80 टक्के तेल पुरवठा आयात करीत आहे. इराक आणि सौदी अरबनंतर इराण हे तिसरे मोठे पुरवठादार आहेत. इराणी तेल रिफायनरीच्या वतीने खरेदीदारांना 60 दिवसांची पत दिली जाते.  अमेरिकेपाठोपाठ युरोपीयन संघानेही इराणवर निर्बंध लादल्यानंतर भारताला इराणधील तेल आयात करण्यास अडचण निर्माण झाली होती. 

ओपेक कच्च्या तेलाचे उत्पादन घटविणार

तेलाच्या दरात झालेल्या घसरणीबाबत ओपेक देशांनी गुरुवारी बैठक घेतली. तेलाचे उत्पादन कमी करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. तेलाचे दर घटत असल्याने उत्पादन कमी करून किमती नियंत्रणात आणण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अमेरिकेतील कच्च्या तेलाच्या किमती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार झालेल्या तेलाचे प्रमाण नोव्हेंबरमध्ये 22 टक्के कमी झाले. सौदी अरेबियाचे तेल मंत्री ओपेकच्या हेवीवेटने गुरुवारी सांगितले की, देशाला दररोज 1 दशलक्ष बॅरल्सचे उत्पादन कमी करायचे आहे. याबाबत शुक्रवारी पुन्हा बैठक होणार असल्याचे ते म्हणाले.