Sun, Jun 07, 2020 10:46होमपेज › National › भीमा कोरेगाव हिंसाचार; फादर स्टेन स्वामींच्या घरावर छापा

भीमा कोरेगाव हिंसाचार; फादर स्टेन स्वामींच्या घरावर छापा

Published On: Jun 12 2019 2:07PM | Last Updated: Jun 12 2019 2:07PM
रांची : पुढारी ऑनलाईन

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिस आणि एटीएसच्या पथकाने झारखंडमधील रांची येथे जाऊन फादर स्टेन स्वामी यांच्या घराची झाडाझडती घेतली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईवेळी त्यांच्या घरातील कंप्यूटरची हार्ड डिस्क आणि अन्य काही दस्तावेज जप्त केले आहेत. यावेळी फादर स्टेन यांची चौकशीही केली. याआधी २८ ऑगस्ट २०१८ मध्ये फादर स्टेन यांच्या घरावर छापा टाकला होता.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलिसांचे पथक मंगळवारी सायंकाळी रांची येथे पोहोचले. सकाळी फादर स्टेन यांच्या घरावर छापा टाकला. भीमा कोरगाव येथे जानेवारी २०१८ मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिस तपास करीत आहेत. भीमा कोरेगाव हिंसाचारापूर्वी पुण्यात एल्गार परिषद घेण्यात आली होती. त्यात हिंसाचारास चिथावणी दिल्याच्या आरोपावरून नक्षली समर्थकांना अटक केली होती. या परिषदेला झारखंडमधील मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टेन स्वामी देखील उपस्थित होते. 

या प्रकरणी तपास करण्यासाठी पोलिसांचे पथक झारखंडमध्ये पोहोचल्यानंतर तेथे त्यांनी फादर स्टेन यांच्या घरावर छापा टाकला. यापूर्वीही पोलिसांनी स्टेन यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यावेळी लॅपटॉप, पेनड्राइव्ह, सीडी, मोबाइल जप्त केला होता. 

कोण आहेत फादर स्टेन स्वामी...

फादर स्टेन स्वामी यांचा जन्म तामिळनाडूमध्ये झाला. ते एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ते गेल्या वर्षापासून झारखंडमधील आदिवासी भागात काम करत आहेत. त्यांनी पुनर्वसन, भूमी अधिग्रहण या मुद्यांवर मोठा संघर्ष केला आहे.