होमपेज › National › ‘नरेंद्र मोदी-समृद्धी आणि जागतिक शांततेचे अग्रदूत’ पुस्तकाचे प्रकाशन

‘नरेंद्र मोदी-समृद्धी आणि जागतिक शांततेचे अग्रदूत’ पुस्तकाचे प्रकाशन

Last Updated: Jun 01 2020 1:49AM
नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वसमावेशक तसेच सर्वांगीण सचित्र चरित्र देशाचे माजी सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव आणि डॉ. योगेश जाधव यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटींच्या छायाचित्रांचादेखील समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कोल्हापुरात 3 जानेवारी 2015 रोजी दैनिक ‘पुढारी’चा 75 वा वर्धापनदिन कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्‍न झाला होता. त्याचाही सचित्र उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे.

‘नरेंद्र मोदी-समृद्धी आणि जागतिक शांततेचे अग्रदूत’ हे पुस्तक देशातील 10 प्रादेशिक भाषांसह 10 आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये देशवासीयांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. भारत तसेच अमेरिकेतील मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तकाचे वेब प्रकाशन करण्यात आले. इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ जुरिस्टचे अध्यक्ष तसेच अखिल भारतीय बार असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आदिश सी. अग्रवाल, अमेरिकन लेखक व कवयित्री एलिझाबेथ होरन यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.

प्रत्येक देशवासीयाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनाविषयी जाणून घ्यायचे आहे. महारोगराईच्या सध्याच्या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने निरोगी असणे आवश्यक आहे. पंतप्रधान त्यांच्या सकारात्मक नेतृत्वाने लोकांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणतील, असा विश्‍वास प्रकाश सोहळ्यात के. जी. बालकृष्णन यांनी व्यक्‍त केला. 

योग आणि कर्मयोगाच्या माध्यमातून सर्व समस्यांचे निराकरण करता येते. मोदी हे कर्मयोगी आहेत. सदैव आशावादी असल्याने त्यांना कधीच कुठल्या गोष्टीचा त्रास होत नाही. ते नेहमी नावीन्यपूर्ण विचार करीत धैर्याने समोर जात मोठे निर्णय घेतात, असे मत योगगुरू बाबा रामदेव यांनी यावेळी व्यक्‍त केले.

जग आर्थिक मंदीच्या सावटाखाली जगत असताना, मोदींनी देशाला मंदीपासून स्वावलंबनाकडे जाण्याचा मूलमंत्र दिला आहे. कोरोना महारोगराईच्या काळात त्यांचे नेतृत्व जगभरात पसरले. सर्वांना आत्मविश्‍वास तसेच सांत्वना देणारे ते महान नेते आहेत, अशी भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारी समितीचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी व्यक्‍त केली. पंतप्रधान मोदी निर्णय घेणारे व्यावहारिक आणि द‍ृढनिश्‍चय करणारे नेते आहेत, असे मत देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पुस्तकातून व्यक्‍त केले आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, आसाम तसेच विविध भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दलची भावना पुस्तकातून व्यक्‍त केली आहे.

मोदींकडून जगाला शांततेचा संदेश

जगाला शांततावादी, परोपकारी समाजाकडे घेऊन जाण्याचे काम पंतप्रधान मोदी करीत आहेत. सुधारणा घडवून आणण्यासाठी दूरद‍ृष्टी तसेच द‍ृढसंकल्प असलेले ते नेते आहेत. केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांनी बरेच उल्लेखनीय कार्य केले आहे. संयुक्‍त राष्ट्र, हवामान बदलासंबंधी तसेच जी-20 संमेलनात त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे, अशी भावना आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी व्यक्‍त केली.

ई-बुक रूपातही उपलब्ध
ई-बुक स्वरूपातही देशवासीयांसाठी हे पुस्तक उपलब्ध करून देण्यात आले आहे. इंग्रजी, अरबी, डच, फ्रेंच, जर्मन, इटालियन, जपानी, मेड्रिन, रशियन तसेच स्पॅनिश या आंतरराष्ट्रीय भाषांसह हिंदी, मराठी, कन्‍नड, गुजराती, आसामी, बंगाली, पंजाबी, तामिळ, तेलगू तसेच उर्दूत हे 626 पानी कॉफीटेबल बुक उपलब्ध होईल.

“पंतप्रधानांच्या द‍ृढ तसेच निर्णायक नेतृत्वामुळे जागतिक पातळीवर भारताचे स्थान उंचावले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधानांची भूमिका महत्त्वाची आहे.”
- जे. पी. नड्डा,
राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप

“लक्षपूर्तीसाठी पंतप्रधान अविरतपणे कार्य करीत आहेत. योग्य ते अनुशासन त्यांनी अवलंबिले आहे. संकल्पपूर्तीच्या दिशेने तीव्र इच्छाशक्‍तीने ते कार्य करीत आहेत.”
- नितीन गडकरी,
केंद्रीय परिवहनमंत्री

 

“पंतप्रधानांचे प्रयत्न, पुढाकार तसेच धोरणांमुळे नजीकच्या काळात सरकार, नागरी संस्था तसेच समाजाकडून एक नवीन भारताची निर्मिती केली जाईल. देश आत्मनिर्भर होऊन जगाला दिशा देईल.”
- राम लाल, ज्येष्ठ नेते,
 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

“देशाच्या सुरक्षेसंबंधी कुठलाही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, हे बालाकोटमधील दहशतवाद्यांच्या तळावर करण्यात आलेल्या कारवाईवरून पुन्हा अधोरेखित होत आहे.”
- जनरल बिपीन रावत,
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ