Wed, Apr 08, 2020 00:15होमपेज › National › ...आणि मोदींनी केला बादल यांचा चरणस्पर्श

...आणि मोदींनी केला बादल यांचा चरणस्पर्श

Published On: Apr 26 2019 2:38PM | Last Updated: Apr 26 2019 2:38PM
वाराणसी : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, शुक्रवारी दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे मोदींनी दिवस, तारीख आणि योग पाहून खास शुभ मुहूर्तावर अर्ज भरला. पंतप्रधान मोदी यांचा अर्ज दाखल करतेवेळी एनडीएतल्या घटक पक्षातील नेते वाराणसीमध्ये दाखल झाले होते. यावेळी उपस्थित असलेले शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांचा चरणस्पर्श करून मोदींनी त्यांचे आशीर्वाद घेतले. 

पंतप्रधान गुरुवारी वाराणसीत पोहोचले. गुरुवारी संध्याकाळी वाराणसीत त्यांनी रोड शो घेतला. आज सकाळी पंतप्रधान मोदींनी वाराणसीतील कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विभागीय कार्यालय गाठले. यावेळी एनडीएतील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. एआयडीएमके नेते पनीर सेल्वम, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सुषमा स्वराज, नितीन गडकरी, एलजेपी नेते रामविलास पासवान, प्रकाश सिंग बादल यावेळी उपस्थित होते. 

विभागीय कार्यालयात पोहोचल्यावर पक्षाध्यक्ष अमित शहा आणि राजनाथ सिंह यांनी मोदींचं स्वागत केले. त्यानंतर मोदींनी प्रकाश सिंह बादल यांच्या पाया पडून नमस्कार केला. बादल यांनीही त्यांना आशीर्वाद दिले. त्यानंतर मोदींनी सर्वच नेत्यांची भेट घेतली.