Mon, Aug 26, 2019 08:09होमपेज › National › सत्तांध ममतांचा लोकशाहीवर आघात

सत्तांध ममतांचा लोकशाहीवर आघात

Published On: May 16 2019 2:02AM | Last Updated: May 16 2019 1:22AM
ताकी (पश्‍चिम बंगाल) :  पीटीआय 

बंगालमध्ये होत असलेल्या भाजपच्या उदयामुळे ममतादीदी घाबरल्या आहेत. त्यामुळे सत्तांध झालेल्या ममतादीदी लोकशाहीच्या मुळावर उठल्या आहेत. दीदींचे गुंड बंदुका आणि बॉम्ब घेऊन नाश करत चालले आहेत. ममतांदीदींनी बंगालची संस्कृती नष्ट केली आहे. त्यामुळेच ममतांची निराशाजनक कारकीर्द संपवण्याचा निर्धार लोकांनी केला आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. बुधवारी येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.

मोदी म्हणाले, अमित शहांच्या रोड शोवर कशा पद्धतीने हल्ला झाला, हे संपूर्ण देशाने टीव्हीवर पाहिले आहे. ममतादीदींनी त्यांचा पक्ष बदला घेईल, असे वक्तव्य केल्यानंतरच अमित शहांच्या रोड शोवर हल्ला झाला. दीदींचे गुंड बंदुका आणि बॉम्ब घेऊन सर्व नष्ट करत चालले आहेत. लोकांचे धाडस आणि विश्‍वासच हे त्रासदायक राज्य कारभार संपवेल. 

पश्‍चिम बंगालमध्ये झालेल्या भाजपच्या उदयामुळे दीदी घाबरल्या आहेत. लोकांनी त्यांना सत्ता दिली; पण त्यांना सत्तेची धुंदी चढलेल्या ममतादीदी लोकशाहीचा गळा घोटत आहेत. चिटफंडातून त्यांनी लोकांचे पैसे लुटले. विचारणा केल्यावर लोकांनाच शिव्या देण्यात आल्या. लोकशाहीने तुम्हाला मुख्यमंत्रिपदाची खुर्ची दिली; पण तुम्ही ती नष्ट करत आहात. गेल्या चार-पाच वर्षांत त्यांनी स्वतःचे रंग दाखवले आहेत. आता त्या सत्तेत राहता कामा नयेत.