प्रत्येक जिल्ह्यात कोव्हिड 19 रुग्णालय उभारण्याची तयारी 

Last Updated: Mar 27 2020 12:54AM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

केवळ तीन आठवड्यांत कोरोना संसर्ग देशातील 100 जिल्ह्यांत पोहोचला आहे. गुरुवारी देशातील 26 राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशातील राज्यातील 102 हून अधिक जिल्ह्यांत संसर्गग्रस्त आढळले आहेत. केंद्र सरकारने त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात कोव्हिड 19 रुग्णालय उभारण्याची तयारी सुरू केली आहे. तूर्त राज्यांना कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी विशेष रुग्णालये तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र लवकरच जिल्हास्तरावर ही रुग्णालये उभारण्याचे आदेश काढण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

सरकारकडून त्यामुळे योजनाबद्धरीत्या नागरिकांच्या आवश्यकतेला पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जात असल्याची माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली. पंतप्रधानांच्या आदेशान्वये मंत्रिमंडळाच्या समूहाच्या देखरेखीखाली ही मार्गदर्शक तत्त्वे बनवण्याचे काम सुरू आहे. लवकरच सर्व राज्यांसोबत मिळून त्यावर वेगाने काम केले जाईन. संसर्गग्रस्त रुग्णांपैकी केवळ 5 टक्क्यांहून कमी रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासल्याची  माहिती आरोग्य मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. केंद्र सरकारने जवळपास एक हजार व्हेंटिलेटर खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यांनाही व्हेंटिलेटर तसेच आयसीयू सेवांवर लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे. लॉकडाऊनमुळे स्थितीवर नियंत्रण मिळवले जाऊ शकते, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्‍त केले आहे.
 
प्रत्येक जिल्ह्यात कोव्हिड 19 रुग्णालय तयार करण्यासह क्‍वारंटाईन तसेच विलगीकरण कक्ष, व्हेंटिलेटर, आयसीयू खाटांमध्ये वाढ करणे, दोन महिन्यांची अ‍ॅडव्हास निवृत्ती वेतन, घरोघरी जाऊन मध्यान भोजनाचे वितरण, रेशन उपलब्ध करवून देण्यासह शेतकरी, मजुरांना मिळणारी आर्थिक मदतीत वाढ करण्याच्या दृष्टीने योजना बनवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.