Sun, Jul 21, 2019 12:03होमपेज › National › खड्ड्यांमुळे दररोज होतो १० लोकांचा मृत्यू 

खड्ड्यांमुळे दररोज होतो १० लोकांचा मृत्यू 

Published On: Dec 07 2018 1:51AM | Last Updated: Dec 07 2018 1:51AM
नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा

मागील पाच वर्षांत देशभरात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात 14 हजार 926 लोकांचा मृत्यू झाला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू गेल्या पाच वर्षांत दहशतवादी हल्ल्यातसुद्धा झालेला नाही, अशी चिंता व्यक्‍त करीत रस्त्यावरील खड्डे हे सीमेपलीकडील दहशतवादापेक्षा धोकादायक आहेत, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने आज तीव्र नाराजी व्यक्‍त केली.

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के. एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा समितीचा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालातील रस्ते अपघातातील बळींची संख्या चिंताजनक असल्याचे सांगून, सर्वोच्चन्यायालयाने गुरुवारी केंद्र सरकारला उत्तर सादर करण्यास सांगितले. या प्रकरणाची सुनावणी जानेवारीमध्ये होणार आहे.

अहवालातील मृत्यूची संख्या अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगत न्यायालय म्हणाले, सन 2013 ते 2017 या कालावधीतील अपघातबळी संख्येवर नजर टाकली, तर असे लक्षात येते की, अधिकारी रस्त्यांची देखरेख करीतच नाही.

दहशतवादी हल्ल्यात मरणार्‍यांची संख्या 803

देशभरातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत पावणार्‍यांची संख्या आणि खड्डेबळींची संख्या यांची तुलना केली, तर दहशतवादी हल्ल्यात मरणार्‍यांची सरासरी संख्या 803 असून, ती खड्डेबळींपेक्षा कमी आहे. सुरक्षा जवान, दहशतवादी आणि सामान्य नागरिकांचा यात समावेश आहे. महाराष्ट्रात 2017 मध्ये खड्ड्यांमुळे 726 लोकांना जीव गमवावा लागला. 2016 सालच्या मृत्यूसंख्येपेक्षा ही संख्या दुप्पट आहे.

खड्ड्यांमुळे दररोज होतो 10 लोकांचा मृत्यू 

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या रस्ता अपघात बळींच्या आकडेवारीनुसार 2017 साली देशात खड्ड्यांमुळे 3597 लोकांना जीव गमवावा लागला. 2016 सालच्या खड्डेे बळींपेक्षा ही संख्या 50 टक्क्यांनी अधिक आहे.पावसाळ्यात रस्त्यांवरील मोठमोठ्या आणि खोल खड्ड्यांत पाणी साचले असल्याने वाहनचालकाला खड्डे दिसत नाहीत. खड्ड्यातील पाण्याचा निचरा करणारी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्याने येथेच त्यांचा घात होतो आणि वाहनातील लोकांना प्राणास मुकावे लागते.

मृत्यूची कारणे कोणती?

रस्त्यावर खड्डे पडणे आणि त्या खड्ड्यांमुळे वाहन अपघातात लोकांना जीव गमवावा लागणे, याचे सर्वात प्रमुख कारण हे सरकारी यंत्रणाची कमालीची उदासीनता आणि भ्रष्टाचाराने पोखरलेली यंत्रणा हे आहे. त्याशिवाय लोकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, हेल्मेट न घालणे ही कारणेही त्यामागे आहेत.