Thu, Sep 21, 2017 23:21होमपेज › National › दोन्ही पंतप्रधानांचा ‘रोड शो’ (पाहा व्हिडिओ)

दोन्ही पंतप्रधानांचा ‘रोड शो’ (पाहा व्हिडिओ)

Published On: Sep 14 2017 2:17AM | Last Updated: Sep 14 2017 2:17AM

बुकमार्क करा

अहमदाबाद ः वृत्तसंस्था

जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे यांचे बुधवारी भारतात आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद विमानतळावर अ‍ॅबे आणि त्यांच्या पत्नी अकी अ‍ॅबे यांचे शानदार स्वागत केले. लष्कराच्या वतीनेही अ‍ॅबे यांना मानवंदना देण्यात आली. अ‍ॅबे दोनदिवसीय भारत दौर्‍यावर आहेत.

अ‍ॅबे यांची गळाभेट घेत मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर दोन्ही पंतप्रधानांनी रोड शो केला. या वेळी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती. साबरमती आश्रमापर्यंत आठ किलोमीटर अंतरापर्यंत रोड शो झाला. 

दरम्यान, अ‍ॅबे दाम्पत्याने साबरमती आश्रमास भेट दिली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आदरांजली वाहिली. मोदी यांनी गांधीजींच्या विचारातील तीन माकडांच्या प्रतिकृतीची अ‍ॅबे यांना भेट दिली. अ‍ॅबे यांच्या पत्नीचा भारतीय पेहराव बघून सारेच आश्‍चर्यचकित झाले. अ‍ॅबे यांनीही मोदी जॅकेटसारखा पोशाख परिधान केला होता. देशातील मुंबई-अहमदाबाद या पहिल्या व महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ गुजरातमधून केला जाणार आहे. अ‍ॅबे हे मोदी यांच्यासमवेत साबरमती रेल्वे स्थानकाजवळ प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत. जपानच्या सहकार्याने होत असलेल्या या प्रकल्पाची किंमत 1.8 लाख कोटी आहे. हा प्रकल्प ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. याशिवाय संरक्षणासह अन्य दहा सामंजस्य करारांवरही मोदी-अ‍ॅबे भेटीत स्वाक्षर्‍या होतील.